पाकिस्तानमध्ये शिक्षणाचा प्रसार करणारी ‘नोबेल’ पुरस्कार विजेत्या मलाला यूसुफजाईला ऑक्सफर्ड विद्यापीठात उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळाली आहे. जगातील अव्वल विद्यापीठात ‘ऑक्सफर्ड’ची गणना केली जाते. मलालानेच स्वत: ट्विटरवरून ही ऑक्सफर्डमध्ये प्रवेश घेतल्याचे जाहीर केले. ऑक्सफर्डमध्ये जाण्यासाठी मी खूप उत्साहित आहे, असे ट्विट तिने केले आहे. मलाला तिथे तत्वज्ञान, राजकारण आणि अर्थशास्त्र विषयांचा अभ्यास करणार आहे.

मलाला अवघ्या १५ वर्षांची असताना तालिबानी दहशतवाद्यांनी तिच्यावर हल्ला केला होता. त्यावेळी मलाला परीक्षा देऊन आपल्या घरी परतत होती. मलालाने पाकिस्तानी मुलींमध्ये शिक्षणाविषयक जागरूकता आणण्याचा प्रयत्न केला होता.

या हल्ल्यानंतर तिला उपचारासाठी त्वरीत बर्मिंगहम येथे नेण्यात आले होते. तेव्हापासून ती आपल्याक कुटुंबीयांबरोबर बर्मिंगहम येथेच राहते. बर्मिंगहम येथूनच मुलींच्या शिक्षणासाठी अभियान राबवत आहे. मलाला यूसुफजाईला २०१४ मध्ये भारताचे कैलास सत्यार्थी यांच्याबरोबर संयुक्तरित्या शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात आला होता. त्यावेळी मलाला अवघ्या १७ वर्षांची होती. शांततेचा नोबेल पुरस्कार प्राप्त करणारी ती सर्वांत कमी वयाची विजेता होती.