पाकिस्तानी विमानांना पळवून लावताना चुकून पाकव्याप्त काश्मीरमध्ये पोहोचलेले भारतीय हवाई दलाचे पायलट विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या धैर्याचे पाकिस्तानी माध्यमांनी कौतुक केले आहे. अशा बिकट परिस्थितीतही अभिनंदन यांनी पाकिस्तानच्या हाती गुप्त कादगपत्रे लागू दिली नाहीत. तसेच पाकिस्तानात भारताच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली, त्यांनी दाखवलेले हे धैर्य कमालीचे असल्याचे पाकिस्तानातील आघाडीचे सरकारी इंग्रजी वृत्तपत्र डॉनने आपल्या वृत्तात म्हटले आहे.

पाकिस्तानातील सामाजिक कार्यकर्ते असलेल्या मोहम्मद रज्जाक चौधरी यांच्या घराजवळ विंग कामांडर यांचे लढाऊ विमान मिग २१ कोसळले होते. चौधरी यांच्या माहितीचा दाखला देताना डॉनने आपल्या वृत्तात म्हटले की, दोन विमानांना आग लागली होती. मात्र, त्यातील एक विमान नियंत्रण रेषेच्या पलिकडे निघून गेले. तर दुसरे विमान आगीच्या ज्वाळांसह वेगाने खाली आले. त्या विमानाचे अवशेष चौधरी यांच्या घराच्या एक किमी लांब पडले. त्यावेळी त्यांनी एक पॅराशूट जमीनीवर येताना पाहिले. ते ही घरापासून एक किमी दूर उतरले.

चौधरी यांनी डॉनशी बोलताना सांगितले की, विमान कोसळल्यानंतर त्यांनी तिथल्या स्थानिक तरुणांना पाकिस्तानी सैनिकांना येईपर्यंत विमानाजवळ न जाण्याचा सल्ला दिला. मात्र, तरीही हे तरुण तिथे गेले आणि त्यांना तिथे पायलट विंग कमांडर अभिनंदन मिळाले. याक्षणी त्यांच्याजवळ एक पिस्तूल होते. त्यांनी या तरुणांना विचारले की, हा भारत आहे की पाकिस्तान त्यावर एकाने चलाखीने सांगितले भारत. हे ऐकताच अभिनंदन यांनी भारताच्या गौरवार्थ काही घोषणाबाजी करीत भारतातला हा कोणता भाग आहे असे विचारले.

त्यावर एका तरुणाने सांगितले की हे किलान आहे. त्यानंतर अभिनिंदन यांनी आपली पाठ दुखत असत असल्याचे सांगत पिण्यासाठी पाणी मागितले. यावेळी काही तरुण जे अभिनंदन यांच्या घोषणाबाजी पचवू शकले नाहीत त्यांनी पाकिस्तानी सैन्याच्या नावाने घोषणाबाजी सुरु केली. त्यानंतर अभिनंदनने हवेत गोळीबार केला. यावेळी त्या तरुणांनी आपल्या हातात दगड उचलले. त्यानंतर अभिनंदन उलट्या दिशेने अर्धा किमी पळाले त्याच्यामागे हे तरुणही पळत होते. त्यानंतर त्यांनी पुन्हा त्यांच्यावर बंदुक रोखत आपल्याला त्यांनी सोडावे यासाठी दोनदा हवेत गोळीबार केला. मात्र त्याचा उपयोग झाला नाही. त्यानंतर त्यांनी एका छोट्या तळ्यात उडी घेतली. त्यानंतर त्यांनी आपल्या खिशातून काही कागदपत्रे आणि नकाशे काढले. यापैकी काही कागद त्यांनी गिळून घेण्याचा प्रयत्न केला आणि बाकी कागद पाण्यात भिजवून टाकले. यावेळी हे तरुण त्यांना वारंवार आपले पिस्तूल टाकण्यास सांगत होते. यावेळी एकाने त्यांच्या पायावर दगडही मारला.

त्यानंतर या तरुणांनी अभिनंदन यांचे दोन्ही हात पकडले, यांपैकी काही जणांनी त्यांना मारले मात्र, काहीजण त्यांना असे करण्यापासून रोखत होते. त्यानंतर पाकिस्तानी सैनिक तिथे पोहोचले आणि अभिनंदन यांना त्यांनी आपल्या ताब्यात घेतले. चौधरी म्हणाले की, सुदैवाने या तरुणांनी त्यांना गोळी मारली नाही कारण त्यांनी बराच वेळ त्यांना दमवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ताब्यात घेण्यात आलेल्या अभिनंदन यांना सैन्याच्या वाहनातून भिमबेरच्या सैन्य प्रतिष्ठानमध्ये नेण्यात आले.

अशा प्रकारे या घटनेचे सविस्तर वृत्त डॉनने दिले आहे. मंगळवारी अभिनंदन मिग २१ लढाऊ विमान चालवत होते. पाकिस्तानी विमान एफ-१६चा पाठलाग करताना चुकून ते नियंत्रण रेषेच्या पलिकडे गेले. यावेळी त्यांच्या विमानाला अपघात होऊन ते होरा गावात पडले. हे ठिकाण नियंत्रण रेषेपासून ७ किमी दूर पाकव्याप्त काश्मीरच्या भिमबेर जिल्ह्यात आहे.