उत्तर पाकिस्तानमध्ये पर्वतराजीच्या कुशीत असलेल्या एका हॉटेलमध्ये घुसून अतिरेक्यांनी नऊ परदेशी पर्यटक व एक पाकिस्तानी वाटाडय़ा अशा दहा जणांना ठार केले. हे पर्यटक चीन, रशिया, युक्रेनचे होते. सशस्त्र अतिरेक्यांनी पोलिसांच्या वेशात गिलगिट-बाल्टिस्तान येथील फेअरी मिडोज या हॉटेलवर हल्ला केला.
नंगा पर्वताकडे जाणाऱ्या गिर्यारोहकांच्या बेसकॅम्पसाठी या हॉटेलचा प्रामुख्याने उपयोग केला जातो. शनिवारी रात्री हा हल्ला झाला, पण सुरक्षा दलांस रविवारी सकाळी या हल्ल्याची माहिती समजली. या हल्ल्यात तीन चिनी नागरिक, एक रशियन व पाच युक्रेनी मारले गेले आहेत. साधारण १४ ते १६ हल्लेखोरांनी गिलगिट स्काउटचा पोशाख घालून हॉटेलमध्ये शनिवारी रात्री साडेदहा वाजता प्रवेश केला व नंतर त्यांनी २५ पाकिस्तानी कर्मचाऱ्यांना बांधून ठेवले व पर्यटकांना ठार केले.
पंतप्रधानांनी फेअरी मिडोज येथील अतिरेकी हल्ल्याचा निषेध केला असून, पर्यटकांसाठी पाकिस्तान हे सुरक्षित ठिकाण असले पाहिजे, यासाठी आम्ही प्रयत्न करीत राहू असे जाहीर केले.