२७ फेब्रुवारीच्या सकाळी भारत आणि पाकिस्तानची लढाऊ विमानं आमने सामने आली होती. यावेळी आपलं आणि पाकिस्तानचं विमान खाली कोसळलं. दोन्ही विमानातील जवान पॅराशूटच्या सहाय्याने सुखरुप खाली उतरले होते. मात्र दोघांच्या नशिबात शेवट वेगळा होता. पाकिस्तानने ताब्यात घेतलेले भारतीय वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान सुखरुप भारतात परतले. मात्र पाकिस्तानी वैमानिकाला मृत्यूला सामोरं जावं लागलं. पाकिस्तानी जनतेने भारतीय समजून आपल्याच वैमानिकाला ठार केलं.

पाकिस्तानी हवाई दलाचे वैमानिक शाहनाज एफ १६ विमानाचं उड्डाण करत होते. भारतीय विमानाने यावेळी एफ १६ विमानाचा वेध घेतला होता. यानंतर शाहनाज यांनी पॅराशूटच्या सहाय्याने पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये लँण्डिंग केलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, शाहनाज सुखरुप खाली उतरण्याआधीच जखमी झाले होते. त्यांचा गणवेश फाटला होता. यावेळी तेथील लोकांना हा भारतीय वैमानिक असल्याचा गैरसमज झाला आणि त्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने शाहनाज यांचा मृत्यू झाला.

भारतीय वैमानिक अभिनंदन यांनाही पाकिस्तानी जनतेने घेरलं होतं. मात्र ऐनवेळी पाकिस्तानी लष्कराने तिथे पोहोचून त्यांना आपल्या ताब्यात घेतलं होतं. पण शाहनाज दुर्देवी ठरले. भारतीय वैमानिक अभिनंदन यांच्याप्रमाणे शाहनाज याचंही कुटुंब सैन्यात आहे. त्यांचे वडील पाकिस्तानी हवाई दलात होते. त्यांनी मिराज आणि एफ १६ विमानांचं उड्डाण केलं आहे.

महत्त्वाचं म्हणजे कोणतीही अधिकृत माहिती न घेता पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल आसीफ गफूर यांनी २८ फेब्रुवारीच्या सकाळी आपण दोन भारतीय विमान पाडल्याचा आणि दोन वैमानिकांना जखमी केल्याचा दावा केला होता. यामधील एक आपल्या ताब्यात असून दुसरा रुग्णालयात असल्याचं सांगण्यात आलं होतं. यानंतर संध्याकाळी त्यांनी एकच भारतीय वैमानिक आपल्या ताब्यात असल्याची नवीन माहिती दिली होती. मात्र यावेळी आपण दिलेल्या चुकीच्या माहितीवर त्यांनी कोणतंही स्पष्टीकरण दिलं नव्हतं.