आंतरराष्ट्रीय सरहद्दीवर तसेच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने केलेल्या माऱयाला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर देण्यास सुरूवात केल्यानंतर गुरूवारी रात्रीपासून पाककडून होणाऱया गोळीबाराचे प्रमाण घटले आहे.
भारताच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले असून हादरलेल्या पाकिस्तानने उभय देशांमध्ये ध्वजबैठक घेऊन सीमेवर शांतता प्रस्थापित करण्याची तयारी दर्शवली. परंतु, जोपर्यंत सीमेवर गोळीबार पूर्णपणे थांबत नाही तोवर कोणतीही चर्चा करणार नसल्याची ठाम भूमिका भारताने ठेवली आहे.  
मंगळवार मध्यरात्रीपासून पाकिस्तानने केलेल्या माऱ्यात दोन महिला ठार तर १५ जखमी झाले होते. भारतानेही या माऱ्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी सुरक्षा दलांना पूर्ण मोकळीक दिली त्यानुसार भारतीय सुरक्षा दलांनी केलेल्या माऱ्यात पाकिस्तानचे १५ जण ठार तर ३० जण जखमी झाले आहेत. पाकिस्तानच्या नागरिकांना लक्ष्य करण्यासाठी गोळीबार केला जात असून आम्ही केवळ पाकच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत आहोत, असे सीमा सुरक्षा दलाच्या(बीएसएफ) अधिकाऱयांनी सांगितले आहे.
भारतातच्या कुरापती काढण्याची सवय अशीच कायम राहिली तर, पाकिस्तानला महागात पडेल अशा कडक शब्दांत गुरूवारी भारताचे संरक्षण मंत्री अरुण जेटली यांनी पाकिस्तानला खडसावले. त्याच वेळी सीमेपलीकडून होणाऱ्या हल्ल्यांचे तरी राजकारण केले जाऊ नये, अशा शब्दात पंतप्रधान मोदींनी काँग्रेससह अन्य विरोधकांना टोला लगावला