येथील हजरत शहाजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर संशयास्पदरीत्या वावरणाऱ्या पाकिस्तानी इसमाला अटक करण्यात आली. अब्दुर रहीम असे त्याचे नाव असून त्याच्याजवळून सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी ५० लाख रुपयांच्या भारतीय चलनी नोटा जप्त केल्या. मात्र या नोटा खऱ्या आहेत की बनावट हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.
अब्दुर रहीम एक आठवडय़ापूर्वी कतारहून दुबईमार्गे बांगलादेशमध्ये आला आहे.
शनिवारी रात्री आपले सामान घेण्यासाठी तो येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला. सामान घेऊन ग्रीन चॅनलमधून जात असताना संशय आल्यावरून सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी त्याची झडती घेतली आणि त्याच्याकडून तब्बल ५० लाख रुपयांच्या नोटा जप्त करून त्याला अटक केली, अशी माहिती सीमाशुल्क विभागाचे साहाय्यक आयुक्त इशरत जहान रुमा यांनी दिली.