पाकिस्तानसह पाच देशांमधील पाहुण्यांना पुढील महिन्यापर्यंत मुक्कामी ठेवू नये, असे निर्देश चीनमधील गुआंग्झो शहरात राहण्याची सामायिक सोय असलेल्या हॉटेल्सना (होस्टेल्स) पोलिसांनी  दिले आहेत.

कुठलेही कारण न देता, या आठवडय़ापासून १० सप्टेंबपर्यंत अफगाणिस्तान, तुर्कस्तान, इराक, सीरिया व पाकिस्तान या देशांमधील पाहुण्यांना परत पाठवण्यास पोलिसांनी आपल्याला सांगितले आहे, या गोष्टीला शहरातील वेगवेगळ्या होस्टेल्सनी दुजोरा दिला असल्याचे वृत्त हाँगकाँग येथील ‘साऊथ चायना मॉर्निग पोस्ट’ने शुक्रवारी दिले.

पाकिस्तानचे चीनशी असलेले सर्वकालीन मधुर संबंध लक्षात घेता, या यादीत त्या देशाचा समावेश होणे आश्चर्याचे मानले जात आहे.

गुआंग्झोमध्ये ११ देशांची पॅन-पर्ल रिव्हर डेल्टा विभागीय सहकार्य परिषद गुरुवारपासून सुरू झाली असून, ४ व ५ सप्टेंबरला पूर्वेकडील हांग्झु शहरात जी-२० च्या नेत्यांची परिषद होत आहे. या पाश्र्वभूमीवर गुआंग्झो पोलिसांनी हे निर्देश दिल्याचे समजते.

या संदर्भात विचारणा केली असता, अशा प्रकारचे कुठलेही धोरण चीनमध्ये राबवले जात असल्याची आम्हाला कल्पना नसल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लु कांग म्हणाले. याउलट चीन व इतर देशांमधील लोकांना ये-जा करण्यास प्रोत्साहन देण्याचे चीनचे धोरण असल्याचे ते म्हणाले.

युग्झिउ जिल्ह्य़ातील एका होस्टेलमधील व्यक्तीने या आशयाची एक लेखी नोटीस दाखवली, तर गुआंग्झोच्या वेगवेगळ्या भागातील होस्टेल्सनीही हीच माहिती दिली. ही बंदी ऑक्टोबपर्यंत सुरू राहू शकते असेही त्यांनी सांगितले.