पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पावलावर पाऊल टाकताना दिसत आहेत. इम्रान खान यांनी क्लीन अँड ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव्हची सुरुवात केली आहे. येत्या ५ वर्षांत पाकिस्तान यूरोपपेक्षा अधिक स्वच्छ करण्याची शपथ घेत असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले आहे. शनिवारी औपचारिकरित्या त्यांनी या कार्यक्रमाची सुरुवात केली आहे. यावेळी त्यांनी शालेय विद्यार्थ्यांसह हातात झाडू घेऊन कचरा साफ केला आणि स्वच्छता अभियानाची सुरुवात केली.

या अभियानाची सुरुवात करताना इम्रान खान म्हणाले की, ग्लोबल वार्मिंगमुळे प्रभावित देशात पाकिस्तान सातव्या क्रमांकावर आहे. तर लाहोर सर्वाधिक प्रदूषणाच्या शहरांमध्ये सामील आहे. यूरोपमध्ये अजिबात घाण नाही. पण आपल्या देशात लोक कुठेही घाण पसरवत आहेत. ते आपले भविष्य जाणूनबुजून खराब करत आहेत.

प्रदूषणामुळे कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यातील ११ वर्षे घटतात. आम्हाला पाकिस्तानच्या नागरिकांच्या मनातून या गोष्टी काढायच्या आहेत. इम्रान खान यांच्या तेहरिक-ए-इन्साफ सरकारने आपल्या कार्यकाळात खैबर पख्तूनख्वाह प्रांतात एक अब्ज झाडे लावली आहेत. संपूर्ण देशभरात १० अब्ज झाडे लावण्याचे आपले लक्ष्य असून येणाऱ्या काळात दुसऱ्या देशांसाठी ते प्रेरणादायक ठरेल, असे ते म्हणाले.

६६ वर्षीय इम्रान खान यांनी आपल्या ट्विटरवर पाकिस्तानच्या युवकांना संबोधित करताना त्यांना स्वच्छता अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. आज मी #cleanGreenPakistan Campign ची सुरुवात केली आहे. येत्या पाच वर्षांत येथील हवा, नदी, जमीन साफ करण्याचे लक्ष्य आहे. त्याचबरोबर अधिकाधिक झाडे लावून पाकिस्तानला ग्रीन पाकिस्तान करायचे आहे. मी सर्व देशवासियांना या अभियानात सहभागी होण्याचा आग्रह करत आहे, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.