जम्मूमधील तुरुंगात काही कैद्यांनी केलेल्या मारहाणीत जखमी झालेला पाकिस्तानी कैदी सनाउल्लाह रंजयचा गुरुवारी सकाळी उपचारांदरम्यान मृत्यू झाला. शरीरातील एकापेक्षा अधिक अवयव निकामी झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे त्याच्यावर उपचार करणाऱया डॉक्टरांनी सांगितले. सनाउल्लाह ५२ वर्षांचा होता.
सनाऊल्लाहवर गेल्या ३ मे रोजी तुरुंगात हल्ला झाला होता. त्यानंतर त्याला जम्मूतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अधिक चांगले उपचार करता यावेत, यासाठी त्याला नंतर एअर ऍम्ब्युलन्सने चंदीगढमधील पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन ऍण्ड रिसर्च येथे हलविण्यात आले होते.
सनाऊल्लाहचा मृतदेह सध्या रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आला असून, त्याचे शवविच्छेदन करण्यात येणार असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.
दरम्यान, सनाउल्लाहच्या मृत्यूची आंतरराष्ट्रीय चौकशी करण्याची मागणी पाकिस्तानने केली आहे. सनाउल्लाहला जम्मूमधील बॉम्बस्फोटाप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झाली होती.
मृतदेह पाकिस्तानला देणार
सनाउल्लाहचा मृतदेह पाकिस्तानकडे देण्यात येईल, असे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी गुरुवारी सांगितले. परराष्ट्र मंत्रालयातील अधिकारी पाकिस्तानच्या अधिकाऱयांच्या संपर्कात आहेत. सर्व औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर त्याचा मृतदेह पाकिस्तानकडे देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.