विरोधकांसोबतची कोंडी फोडण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी सुरू केलेले प्रयत्न सोमवारी निष्फळ ठरले. शरीफ यांनी चर्चेचा प्रस्ताव ठेवला असतानाही शरीफ यांनी पंतप्रधान पदावरून पायउतार व्हावे ही मागणी शरीफ विरोधकांनी आंदोलनाच्या पाचव्या दिवशीही लावून धरली. ‘पाकिस्तान तेहरीके इन्साफ’चे अध्यक्ष इम्रान खान आणि धर्मगुरू ताहिरूल काद्री यांनी आपापल्या भूमिकेपासून तसूभरही न ढळण्याचा निर्धार कायम ठेवल्याने राजधानीतील जनजीवन विस्कळीत झाले. निदर्शकांनी रस्त्यांवर जागोजागी धरणे धरल्याने वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली. प्रशासकीय कामकाजावर त्याचा परिणाम झाला.
विरोधकांच्या सर्व घटनात्मक मागण्यांवर आपण चर्चेस तयार आहोत. पण त्यांनी आधी सरकारसोबत चर्चेला यावे, असे आवाहन शरीफ यांनी इम्रान खान आणि ताहिरूल काद्री यांना केले, परंतु त्याला दोन्हीही नेत्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. याउलट शरीफ यांनी ४८ तासांत खुर्ची सोडावी, असा निर्वाणीचा इशारा देत ‘सविनय कायदेभंग’ कायम ठेवला.
शरीफ सरकारने विरोधकांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी दोन समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव खान यांच्या प्रतिनिधींनी साफ फेटाळून लावला.
शरीफ यांनी देशातील प्रमुख राजकीय पक्षांसोबत बसून चर्चा करावी, या मागणीवर त्यांनी जोर दिला आहे.

प्रमुख राजकीय पक्ष आंदोलनापासून लांबच..
शरीफ सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी ‘पाकिस्तान तेहरीके इन्साफ’चे अध्यक्ष इम्रान खान यांनी आपली राजकीय ताकद पूर्ण पणाला लावली आहे. परंतु त्यांना पाकिस्तानातील इतर राजकीय पक्षांचा म्हणावा तितका पाठिंबा मिळू शकला नाही. खान यांचा ‘आझादी मोर्चा’ आणि ताहिरूल काद्री यांचा ‘क्रांती मार्च’मध्ये पाचव्या दिवशी फार मोठय़ा संख्येने आंदोलक रस्त्यावर उतरताना दिसले नाहीत. विरोधकांनी या आंदोलनापासून दूर राहणे पसंत केले. पाकिस्तानचे माजी अध्यक्ष असिफ अली झरदारी यांनी खान यांचे आंदोलनच घटनाबाह्य़ तत्त्वांवर उभे असून त्याआधारे ते घटनात्मक अधिकार कसे काय मिळवणार आहेत, हे कळायला मार्ग नाही. त्यामुळे लोकशाही व्यवस्थेलाच त्याचा धोका निर्माण झाला आहे. उलट राजकीय समस्यांवर तोडगा काढण्यासाठी कोणीतरी पुढे यायला हवे. या गोष्टींवर मात्र काहीही घडताना दिसत नाही, अशी टीका केली. याच वेळी देशातील व्यावसायिक, उद्योगपती आणि राजकीय विश्लेषकांनीही आंदोलनावर टीका केली आहे.

शरीफ नमले!
*  इम्रान खान यांनी ‘सविनय कायदेभंग’ कायम ठेवल्यानंतर काही तासांतच शरीफ यांच्याकडून चर्चेचा प्रस्ताव.
*‘पाकिस्तान तेहरीके इन्साफ’शी चर्चा करण्यासाठी सोमवारी सायंकाळी उशिरापर्यंत दोन समित्यांच्या स्थापनेची सरकारकडून घोषणा होण्याची शक्यता.
* समित्या विरोधकांच्या मागण्या ऐकून घेतील. त्यासाठी स्वतंत्र बैठक बोलावली जाईल.
सरकारमध्ये बसलेले ‘व्यावसायिक’ स्वत:च्या तुंबडय़ा भरत आहेत. हा ‘सविनय कायदेभंग’ मी माझ्यासाठी नसून तुमच्यासाठी पुकारला आहे. म्हणून आम्ही सरकारचे खिसे भरण्यासाठी पैसे देणार नाही. आम्ही सरकारकडे कर, वीज आणि गॅसची बिले भरणार नाही.
– इम्रान खान, अध्यक्ष, पाकिस्तान तेहरीके इन्साफ