पाकिस्तानी लोकसंगीतातील ज्येष्ठ गायिका रेश्मा यांचे लाहोर येथे घशाच्या कर्करोगाने रविवारी निधन झाले. त्या ६६ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात मुलगा उमेर व मुलगी खादिजा असा परिवार आहे. ‘दमा दम मस्त कलंदर, लंबी जुदाई’ यांसारख्या गीतांनी त्यांनी संगीत क्षेत्रावर ठसा उमटवला होता.
रेश्मा यांचा जन्म १९४७ मध्ये राजस्थानातील बिकानेर येथे बंजारा समाजात झाला. फाळणीनंतर त्यांचे कुटुंबीय कराचीला आले. सीमा माझ्यासाठी महत्त्वाची नाही. कलाकार हा सर्वाचा असतो असे त्या म्हणत असत. हायो रब्बा नहिओ लगडा दिल मेरा, आँखियों नो रहे दे आँखिया दे कोल कोल.. ही त्यांची गीते नंतर गाजली. त्यांचे बरेच चाहते होते. त्यांना ‘सितारा ए इम्तियाज’ व ‘लिजंड्स ऑफ पाकिस्तान’ हे मोठे पुरस्कार मिळाले होते. १९८०च्या सुमारास भारतात कार्यक्रम केले होते. चित्रपट निर्माते सुभाष घई यांनी त्यांच्या ‘हीरो’ चित्रपटात त्यांना गाण्याची संधी दिली. त्यातील लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेले ‘लंबी जुदाई..’ हे गाणे खूप गाजले होते.