पाकिस्तानी सैनिक भारतीय लष्कराच्या हल्लात ठार झाले. याच सैनिकांचे मृतदेह मागण्यासाठी पाकिस्तानने पांढरे निशाण फडकावल्याची घटना नियंत्रण रेषेजवळ (LOC) घडली आहे. जम्मू काश्मीर येथील हाजीपूर भागात भारतीय सैन्याने दोन पाकिस्तानी सैनिकांना कंठस्नान घातलं. पाकिस्तानने नियंत्रण रेषेचं उल्लंघन करत गोळीबार केला. ज्याचं चोख प्रत्युत्तर भारतीय लष्कराने दिलं आणि दोन पाकिस्तानी जवानांचा खात्मा केला. या दोन जवानांच्या मृतदेहांची मागणी करत पाकिस्तानी लष्कराने पांढरे निशाण फडकवले आणि हे दोन मृतदेह घेऊन गेले.

११ सप्टेंबर रोजी ही घटना घडली आहे. यासंदर्भातला व्हिडीओ ANI ने ट्विट केला आहे. पाकिस्तानी सैनिकांचा दोन दिवसांपूर्वी भारतीय सैन्याने खात्मा केला. मात्र त्यांचे मृतदेह नेण्यास पाकिस्तानने सुरुवातीला नकार दिला होता. मात्र शुक्रवारी म्हणजेच १३ सप्टेंबरला पांढरे निशाण दाखवत पाकिस्तानी लष्कराने सैनिकांचे मृतदेह पाकिस्तानात नेले.

 

अनुच्छेद ३७० रद्द केल्यापासून पाकिस्तान सैरभैर झाला आहे. नियंत्रण रेषेजवळ शस्त्रसंधीचे उल्लंघनही सुरु आहे. याआधीही पाकिस्तानी सैन्याने गोळीबार केला आहे. मात्र भारतीय लष्कराने त्यांना वारंवार प्रत्युत्तर दिले आहे. आता दोन दिवसांपूर्वी जेव्हा पुन्हा एकदा पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं तेव्हा पुन्हा एकदा भारतीय लष्कराने जोरदार प्रत्युत्तर दिलं. ज्यानंतर मृतदेह नेण्यासाठी पाकिस्तानने पांढरे निशाण फडकवले. ज्याचा व्हिडिओ एएनआयने पोस्ट केला आहे.