पाकिस्तानच्या सैन्याने बुधवारीही शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्याची आगळीक केली आहे. पूँछ जिल्ह्य़ातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तोफगोळ्यांचा मारा करून गोळीबारही करण्यात आला आहे. किरनी आणि शहापूर पट्टय़ातही पाकिस्तानने हल्ले चढविले आहेत, मात्र त्यामध्ये कोणीही जखमी झालेले नाही.
पाकिस्तानकडून सातत्याने होणाऱ्या आगळिकीला भारतीय जवान सडेतोड प्रत्युत्तर देत आहेत. मात्र गेल्या काही दिवसांत पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय सीमेवर गोळीबार करण्यात आलेला नाही, असे जम्मू परिमंडळाचे विभागीय आयुक्त शांत मनू यांनी सांगितले.
१० हजारांचे स्थलांतर
कथुआ जिल्ह्य़ात सीमेपलीकडून होणाऱ्या हल्ल्यांमुळे जिल्हा प्रशासनाने ‘मिशन हिफाजत’ मोहीम हाती घेतली असून त्याअंतर्गत सीमेवर राहणाऱ्या १० हजार जणांना स्थलांतरित करण्यात आले आहे. स्थलांतरितांसाठी निवारा तंबू उभारण्यात आले असून तेथे त्यांना सर्व सोयी दिल्या जात आहेत.