छत्तीसगडमधील कांकेर येथे सुरक्षा रक्षकांसोबत झालेल्या चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांकडे पाकिस्तानच्या लष्करात वापरात असलेली रायफल आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. यावरुन नक्षलवाद्यांना पाकिस्तानकडू रसद पुरवली जात असल्याचा संशय सुरक्षा दलाने व्यक्त केला आहे.

कांकेरमधील तडोकी येथे चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाले होते. त्यांच्याकडून सुरक्षा रक्षकांनी शस्त्रसाठा जप्त केला. मात्र, यातील शस्त्रे पाहून सुरक्षा रक्षकांनीही आश्चर्य व्यक्त केले आहे. या साठ्यामध्ये अमेरिकी बनावटीची जी-३ रायफल आढळून आली आहे. ही रायफल सध्या पाकिस्तानी लष्करामध्ये वापरात आहे. त्याचबरोबर एक एसएलआर रायफल, एक ३०३ रायफल, एक १२ बोअरची रायफल आणि काही काडतुसेही सापडली आहेत.

छत्तीसगडची राजधानी रायपूरपासून २०० किमी अंतरावरील तडोकी येथील मेलापूर आणि मुरनार गावात नक्षलवाद्यांच्या गटाकडून सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला मोठ्या संख्येने नक्षलवाद्यांनी हजेरी लावली होती. या बैठकीची माहिती नक्षलविरोधी पथकाला मिळाली. त्यानंतर जिल्हा राखीव पोलीस दालाचे जवान नक्षलींच्या या ठिकाण्यावर पोहोचले, सुरक्षा रक्षकांची चाहूल लागताच नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरु केला. त्याला जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. यामध्ये दोन नक्षलवादी ठार झाले.