भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंध तणावपूर्ण असले तरी पाकिस्तानी हद्दीतून जात असताना प्रतिकूल हवामानाच्या कचाटय़ात सापडलेले भारताचे प्रवासी विमान पाकिस्तानच्या हवाई वाहतूक नियंत्रकांनी अपघात होण्यापासून वाचवले. हे विमान जयपूरहून मस्कतला निघाले होते.

पाकिस्तानने अलीकडे त्यांची हवाई हद्द खुली केली असल्याने ते सिंध प्रांतावरून जात असताना अचानक हवामान खराब झाले. हवामान प्रतिकूल असल्याने वैमानिकाने धोक्याचा संदेश जारी केला होता, त्यानंतर पाकिस्तानी हवाई वाहतूक नियंत्रकांनी त्या विमानास या भागातून सहिसलामत पुढे जाण्यासाठी सूचना दिल्या.

दी न्यूज इंटरनॅशनलच्या वृत्तानुसार हे विमान १५० प्रवाशांना घेऊन गुरूवारी कराचीवरून जात होते, त्या वेळी अचानक विजांचा कडकडाट सुरू झाला. त्यामुळे विमान ३६००० फुटांवरून ३४००० फुटांवर आणले  गेले. त्यानंतर वैमानिकाने धोक्याचा संदेश प्रसारित केला. पाकिस्तानच्या हवाई वाहतूक नियंत्रकांनी या वैमानिकाच्या संदेशास प्रतिसाद देऊन या भागातून सहिसलामत जाण्यासाठी मार्गदर्शन केले. पाकिस्तानने सोळा जुलै रोजी पाच महिन्यांच्या र्निबधानंतर हवाई वाहतूक क्षेत्र भारताला खुले केले होते. बालाकोट हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानने २६ फेब्रुवारीपासून त्यांचे हवाई क्षेत्र भारतीय विमानांना बंद केले होते. त्यामुळे भारतीय विमानांना लांबच्या मार्गाने जावे लागत होत.  अलीकडेही काश्मीर प्रश्नावरून पाकिस्तानने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सौदी अरेबियास जाण्यासाठी त्यांचे हवाई क्षेत्र खुले करण्यास नकार दिला होता.