शीख धर्मीयांचे तीर्थक्षेत्र असलेले पंजाबमधील डेरा बाबा नानक साहिब ते पाकिस्तानातील गुरुद्वारा दरबार साहिब कर्तारपूर या ठिकाणी जाण्यासाठी भारत-पाकिस्तानने द्विपक्षीय चर्चेद्वारे सीमाभागात खास मार्ग तयार केला आहे. त्याला कर्तारपूर कॉरिडॉर असे संबोधले जात आहे. दोन्ही देशांदरम्यन शांतता आणि सुसंवादाचे प्रतीक समजल्या जाणाऱ्या या मार्गानेच पाकिस्तान भारतात खलिस्तानवादी दहशतवादी पाठवू शकतो, असा संशय गुप्तचर यंत्रणा आणि या विषयावरील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. स्वतंत्र खलिस्तानची मागणी करणाऱ्या या चळवळीला पाकिस्तानद्वारे प्रोत्साहन देण्यात येत आहे.

तज्ज्ञांच्या आरोप केला आहे की, पाकिस्तान कर्तारपूर कॉरिडॉरचा वापर करुन खलिस्तानवादी चळवळीच्या समर्थकांचे काही गट (जथ्थे) भारतात पाठवून या चळवळीला खतपाणी घालण्याचे काम करीत आहे. तज्ज्ञांनी यावरही भर दिला की, पाकिस्तान आपला हा कुटील हेतू साध्य करण्यासाठी जगभरातील शीख समाजाला निशाणा बनवू शकतो. तसेच याद्वारे कर्तारपूर या पवित्रस्थळाचा वापर केला जाऊ शकतो.

यासंदर्भात एएनआयशी बोलताना नवी दिल्लीतील इन्स्टिट्युट ऑफ कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंटचे कार्यकारी संचालक अजय सहानी म्हणाले, पाकिस्तानला शीख धर्मीयांच्या धार्मिक भावनांबाबत कसलीही सहानुभूती नाही. तो केवळ आपला हेतू साध्य करण्याच्या प्रयत्नात आहे.

कर्तारपूरचा मुद्दा पाकिस्तानने शीखांच्या भावनांचा विचार करुन घेतलेला नाही. तर कट्टरतावादी आणि दहशतवाद्यांना गोळा करण्यासाठी घेतला आहे. याद्वारे मोठ्या प्रमाणावर दहशतवादी पाकिस्तानातून सहजरित्या भारतात दाखल होतील, असेही सहानी यांनी म्हटले आहे.

तज्ज्ञांनी असाही आरोप केला आहे की, पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयने या मुदद्यावरुन वारंवार नवी दिल्लीशी वाद घालण्याचा प्रयत्न केला आहे. कारण, शीखांचे कल्याण हा मुद्दा पाकची राजधानी इस्लामाबादची कधीही प्रायोरिटी नव्हती, कारण पाकिस्तानमध्येच अल्पसंख्य असणाऱ्या शिखांवर अनन्वित अत्याचार केले जात आहेत. या शीखांना कट्टरवादी मुस्लमांनी नेहमीच टार्गेट केले आहे. मात्र, या घटनांविरोधात कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही.