भारताकडून दाव्याचे जोरदार खंडन

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर करण्यात आलेल्या गोळीबारात भारताचे ११ जवान ठार झाल्याचा पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांनी केलेला दावा भारतीय लष्कराने गुरुवारी साफ फेटाळून लावला. पाकिस्तानच्या गोळीबारात १४, १५, अथवा १६ नोव्हेंबर रोजी एकही जवान मरण पावला नाही, १४ नोव्हेंबर रोजी पाकिस्तानच्या लष्कराने भारतीय जवानांना ठार मारल्याचा पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांचा दावा सपशेल खोटा आहे, असे लष्कराच्या एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले. पाकिस्तानचे लष्करप्रमुख जन. राहील शरीफ यांनी, पाकिस्तानच्या लष्कराने ११ भारतीय जवानांना ठार मारल्याचा दावा बुधवारी केला होता, मात्र त्या दिवशी भारतीय जवानांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाकिस्तानच्या सात सैनिकांना कंठस्नान घातले. ज्या दिवशी पाकिस्तानचे सात सैनिक ठार करण्यात आले त्याच दिवशी पाकिस्तान लष्कराने ११ भारतीय जवानांना ठार केल्याचा दावा शरीफ यांनी केला होता. भारत आणि पाकिस्तान यांच्यात सध्या सुरू असलेल्या चकमकीत पाकिस्तानने ४०-४४ भारतीय जवानांना ठार मारल्याचा दावा शरीफ यांनी केला, भारतीय लष्कराने हा दावा सपशेल फेटाळला आहे. भारताने धैर्य दाखवून वस्तुस्थिती स्वीकारावी, असे शरीफ यांनी म्हटले आहे.

 

काश्मिरी लोकांच्या त्रासाकडे दुर्लक्ष करणे कठीण – एर्दोगन

इस्लामाबाद : भारत व पाकिस्तानातील वाढत्या तणावामुळे काश्मिरी लोकांना होणाऱ्या कष्टाकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही, असे सांगतानाच काश्मीर प्रश्न दोन्ही देशांनी संवादाच्या माध्यमातून सोडवावा, असे आवाहन तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसेप एर्दोगन यांनी गुरुवारी केले.

पाकिस्तान भेटीवर बुधवारी येथे आलेल्या एर्दोगन यांनी आज पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्याशी झालेल्या सविस्तर चर्चेनंतर हे विधान केले. नियंत्रण रेषेवरील वाढत्या तणावामुळे काश्मीरमधील आमच्या बंधूभगिनींना जो त्रास सोसावा लागतो आहे त्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही, असे ते म्हणाले.

या काटेरी मुद्दय़ावर तोडगा शोधण्यासाठी संवादाच्या महत्त्वावर एदरेगन यांनी भर दिला. पाकिस्तान व भारत यांनी संवाद साधून काश्मीर मुद्दय़ावर तोडगा शोधणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. यावर्षीच्या सुरुवातीला तुर्कस्तानमध्ये फसलेल्या बंडाच्या प्रयत्नाच्या वेळी तुर्कस्तानच्या निर्वाचित सरकारची बाजू घेतल्याबद्दल त्यांनी पाकिस्तानचे आभार मानले.