संपूर्ण जगात करोना व्हायरसचा वेगाने फैलाव होत आहे. शेजारच्या पाकिस्तानातही करोनाची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. पुढच्या काही दिवसात लाहोरमध्ये करोना व्हायरसचे रुग्ण मोठया प्रमाणावर वाढू शकतात असा इशारा पाकिस्तानातील डॉक्टरांनी दिला आहे.

इराणमध्ये यात्रेसाठी गेलेले ५,६०० यात्रेकरु पाकिस्तानात परतले आहेत. ते देशाच्या वेगवेगळया भागात विखुरले आहेत. इराणला लागून असलेल्या बलुचिस्तानच्या सीमेवरुन हे यात्रेकरु पाकिस्तानात दाखल झाले आहेत. करोना व्हायरसमुळे बेजार असलेल्या देशांमध्ये इराणही आहे. इराणमध्ये मोठया प्रमाणावर करोना व्हायरसचे रुग्ण आहेत. इराणमधून आलेल्या या यात्रेकरुंना क्वारंटाइन करण्याची आवश्यकता होती. पण पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे ही रुग्ण संख्या वाढू शकते असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

पाकिस्तानात करोना व्हायरसमुळे आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला आहे. तिथे करोनाचे एकूण ३०१ रुग्ण आहेत. त्यात एकटया सिंध प्रांतात २०८ रुग्ण आहेत. पंजाबमध्ये ३३, बलुचिस्तानात १९ आणि राजधानी इस्लामाबादमध्ये दोन रुग्ण आहेत.

हवाई वाहतूक पूर्णपणे बंद करा, संपूर्ण देशाला क्वारंटाइन करा असा तज्ञांनी सल्ला दिला आहे. संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक साधनांची कमतरता असल्यामुळे अनेक डॉक्टर्स आणि नर्सेसनी काम बंद करण्याचा इशारा दिला आहे. अफगाणिस्तान आणि इराणला लागून असणारी सीमा बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.