शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याच्या संदर्भात पाकिस्तानने भारताचे उपउच्चायुक्त गौरव अहलुवालिया यांना लागोपाठ चौथ्यांदा बोलावून निषेध व्यक्त केला.

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारतीय लष्कराकडून शस्त्रसंधीचे वारंवार उल्लंघन होत असल्याचा आरोप पाकिस्तानने केला असून पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाचे दक्षिण आशिया महासंचालक महंमद फैजल यांनी म्हटले आहे की, ‘१८ ऑगस्टला भारताने हॉट स्प्रिंग व चिरीकोट भागात केलेल्या गोळीबाराचा आम्ही निषेध करीत आहोत. या गोळीबारात दोन वयस्कर नागरिक ठार झाले असून सात वर्षांचा एक मुलगा गंभीर जखमी झाला. भारताने २०१७ पासून शस्त्रसंधीचे उल्लंघन चालवले असून एकूण १९७० वेळा असे उल्लंघन केले आहे.’

नागरी भागात सुरू असलेला गोळीबार हा निषेधार्ह असून आंतरराष्ट्रीय मानवी हक्कांचे व कायद्यांचे त्यामुळे उल्लंघन होत आहे, त्यामुळे प्रादेशिक शांतता व सुरक्षितता धोक्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी केला. २००३ मधील शस्त्रसंधी कराराचा सन्मान भारताने केला पाहिजे तसेच यापूर्वीच्या घटनांची चौकशी करावी असे फैजल यांनी सांगितले.

पाकिस्तानने गौरव अहलुवालिया यांना बोलावून शस्त्रसंधी उल्लंघनाचा निषेध करण्याची ही चौथी वेळ होती. अहलुवालिया यांना १४,१५, १६ ऑगस्ट रोजी बोलावून समज देण्यात आली होती.