पाकिस्तानने हाफिझ सईद विरोधात कारवाईचे पाऊल उचलले असले तरी त्यावर भारताचा अजिबात विश्वास नाही. पाकिस्तानने लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिझ सईदवर दहशतवादाचे आरोप ठेऊन त्याच्या अटकेची खात्री दिली आहे. पण हा सर्व डोळयात धुळफेक करण्याचा प्रकार असल्याचे भारताने म्हटले आहे.

पाकिस्तानने त्यांच्या देशातून चालणाऱ्या भारतविरोधी दहशतवादी कारवाया नियंत्रणात आणण्यासाठी अजूनपर्यंत ठोस पावले उचललेली नाहीत. हाफिझ सईद २००८ साली मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार आहे. भारताने त्याच्याविरोधात सबळ पुरावे देऊनही पाकिस्तानने त्याच्यावर कारवाई केली नाही. त्याचा तिथे मुक्त वावर सुरु आहे.

आंतरराष्ट्रीय दबावामुळे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील पोलिसांनी बुधवारी सईद विरोधात दहशतवादाला पैसा पुरवणे आणि आर्थिक गैरव्यवहार या आरोपांखाली एफआयआर दाखल केला. दहशतवादी कायद्याखाली पाकिस्तान सरकारने २०१७ साली हाफिझ सईद आणि त्याच्या चार सहकाऱ्यांना ताब्यात घेतले होते. पण ११ महिन्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली.

पाकिस्तान त्यांच्या भूमीवरील दहशतवाद्यांविरोधात ठोस, सत्याच्या कसोटीवर टिकणारी कारवाई करेल त्यावेळी त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल विचार करता येईल. काही वेळ आंतरराष्ट्रीय समुदायाची दिशाभूल करण्यासाठी अशी कारवाई केली जाते असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार म्हणाले.