पंजाबमधील अमृतसर येथे दोन दिवसांपूर्वी निरंकारी भवनावर झालेल्या हल्लाप्रकरणी प्राथमिक चौकशीतून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. या हल्ल्यामध्ये वापरण्यात आलेले ग्रेनेड हे पाकिस्तानमध्ये तयार करण्यात आले असल्याचा खळबळजनक खुलासा मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केला आहे. पाकिस्तान ऑर्डनन्स फॅक्टरीचा यावर शिक्का असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

पंजाब पोलिसांना गेल्या महिन्यांत उध्वस्त करण्यात आलेल्या एका दहशतवादी गटाच्या कटामध्ये स्फोटासाठी वापरण्यात येणारे पाकिस्तानात निर्माण करण्यात आलेले HG-84 हे ग्रेनेड आढळून आले होते. यावरुन सीमेपलीकडून या कारवाया होत असल्याचा उघड झाले होते. काही विशेष गटांकडून अशा स्वरुपाचे दहशतवादी हल्ले घडवून आणण्याचा कट आखला जात आहे. यामागे पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयकडून खलिस्तानवादी चळवळीला प्रोत्साहन दिले जात असल्याची शक्यता आहे. किंवा यामागे काश्मिरी दहशतवादी गटांचाही हात असू शकतो, असे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी म्हटले आहे.

दरम्यान, या हल्ल्यामागे १९७८ मध्ये झालेल्या हल्ल्याचा संदर्भ असल्याची शक्यता नाही असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. १९७८ मध्ये निरंकारी शिखांच्या वादातून बैसाखी सणाच्या दिवशीच स्फोट घडवून आणण्यात आला होता. यामध्ये १३ शिखांचा मृत्यू झाला होता. त्यानतंर १९८०च्या दशकात पंजाबमध्ये दहशतवादी कारवाया सुरु झाल्या होत्या. त्यावेळी झालेला हल्ला हा धार्मिक वादातून झाला होता, त्यामुळे दोन दिवसांपूर्वी झालेला हल्लाही असाच धार्मिक वादातून झाला असल्याचा समज कोणीही करुन घेऊ नये. त्यामुळे जनतेने यावरुन घाबरुन जाऊ नये असे आवाहनही त्यांनी केले आहे.

सुरक्षा एजन्सीजच्या माहितीनुसार, खलिस्तानी आणि काश्मीरी दहशतवादी पंजाबमध्ये अशांतता पसरवण्याच्या प्रयत्नात आहेत. पंजाबची सुमारे ५५३ किमी सीमा ही पाकिस्तानशी जोडली गेलेली आहे.

अमृतसरच्या राजासांसी परिसरातील आदिवाल गावात निरंकारी भवन येथे रविवारी ग्रेनेड हल्ला करण्यात आला होता. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला होता तसेच १० जण जखमी झाले होते. येथील निरंकारी भवनामध्ये सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी दुचाकीवरुन आलेल्या दोन अज्ञात तरुणांनी मंचाच्या दिशेने ग्रेनड फेकला. त्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला, हे दोघेही चेहरा झाकून आले होते.