पाकिस्तानात अस्थिरतेचे वातावरण निर्माण करण्यासाठी भारताच्या ‘रॉ’ने कराचीस्थित मुत्ताहिदा क्वामी मूव्हमेण्ट (एमक्यूएम) पक्षाला पैसे दिले असल्याच्या वृत्ताची आणि आरोपाची खातरजमा करण्यासाठी पाकिस्तानने याबाबतची औपचारिक चौकशी सुरू केली आहे.
फाळणीनंतर जे उर्दूभाषक भारतातून पाकिस्तानात आले त्यांचे एमक्यूएमवर वर्चस्व असून त्यांना भारताच्या रीसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसिस विंगने (रॉ) आर्थिक साहाय्य केले, त्याची चौकशी करण्याची कामगिरी अंतर्गतमंत्री निसार अली खान यांनी एफआयएवर सोपविली आहे.
एमक्यूएमला भारताकडून आर्थिक साहाय्य केले जात असल्याचे पुरावे आपण पाहिले आहेत, असा दावा एक उद्योगपती आणि एमक्यूएमचा लंडनस्थित सदस्य सरफराज मर्चण्ट याने एका दूरचित्रवाणी वाहिनीशी बोलताना केल्यानंतर अंतर्गत मंत्रालयाने चौकशीसाठी पुढाकार घेतला, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.शस्त्रे खरेदी करण्यासाठीही भारताने पैसे पुरविले आहेत. एमक्यूएमचा प्रमुख अल्ताफ हुसेन याच्या लंडनमधील घरात शस्त्रांच्या खरेदीबाबतच्या अनेक याद्या सापडल्या आहेत. स्कॉटलण्ड यार्ड पोलिसांनी २०१४ मध्ये टाकलेल्या छाप्यात सदर याद्या मिळाल्या आहेत, असे मर्चण्ट याने म्हटले आहे.पाकिस्तानात अस्थिरतेचे वातावरण निर्माण करण्यासाठी एमक्यूएमला आर्थिक साहाय्य केल्याच्या आरोपाचे भारताने सातत्याने खंडन केले आहे. एमक्यूएमनेही हा आरोप निराधार आणि खोटा असल्याचे म्हटले आहे.