पाकिस्तानात करोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे. पाकिस्तानात करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १४०० पर्यंत जाऊन पोहोचली आहे. सिंध प्रांतापाठोपाठ पाकिस्तानच्या पंजाब प्रांतामध्ये करोनाच्या रुग्णांची मोठी संख्या आहे. करोनामुळे पाकिस्तानात ११ जणांचा मृत्यू झाला असून, २५ पॉझिटिव्ह रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

पाकिस्तानातून लोक मोठया संख्येने इराणला यात्रेसाठी गेले होते. यात्रेवरुन परतल्यानंतर हे नागरीक वेगवेगळया भागात विखुरले गेले. त्यामुळे पुढच्या काही दिवसात रुग्ण संख्या मोठया प्रमाणावर वाढू शकते असा इशारा पाकिस्तानातील डॉक्टरांनी आधीच दिला होता.

दरम्यान स्थानिक नागरिकांकडून जोरदार विरोध होत असतानाही पाकिस्तानी लष्कर आपल्या देशातील करोना पॉझिटिव्ह रुग्णांना पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट-बल्टिस्तान या भागात हलवत आहे. मीरपूर आणि अन्य भागांमध्ये विशेष क्वारंटाइन सेंटर बनवण्यात आले आहेत अशी माहिती पीओकेमधील सूत्रांनी दिली.

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील करोना पॉझिटिव्ह रुग्णांना पाकिस्तानी लष्कराकडून पीओकेमध्ये आणले जात आहे. पाकला पंजाब प्रांतामध्ये साफसफाई करायची आहे. लष्करी तळ आणि लष्करी कुटुंब राहत असलेल्या भागांमध्ये एकही करोनाग्रस्त रुग्ण नकोय असे आदेश पाकिस्तानी लष्कराकडून देण्यात आले आहेत.