काश्मीर हे भारताचे अविभाज्य अंग आहे. पण पाकिस्तानने अजून हे सत्य स्वीकारलेले नाही. पाकिस्तानातील PTV न्यूजने नकाशा दाखवताना चूक झाली म्हणून थेट पत्रकारांवरच कारवाई केली. पत्रकारांकडून झालेल्या चुकीचा संदर्भ काश्मीरशी आहे. या नकाशामध्ये काश्मीरला भारताचा भाग दाखवण्यात आले होते. त्यामुळे तिथल्या दोन पत्रकारांना नोकरी गमवावी लागली आहे.

सहा जूनला ही घटना घडली. पाकिस्तानी संसदेत आठ जूनला हा विषय उपस्थित करण्यात आला. त्यानंतर सिनेटचे चेअरमन सादीक संजरानी यांनी हा विषय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या स्थायी समितीकडे पाठवला. सात जूनला पाकिस्तान टेलिव्हिजन व्यवस्थापकडून या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. या चुकीसाठी जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असे सोशल मीडियावर सांगितले. पीटीआयने हे वृत्त दिले आहे.

आणखी वाचा- “आमचं करोना पॅकेजही पाकिस्तानच्या जीडीपीपेक्षा जास्त आहे”, मदतीची ऑफर देणाऱ्या इम्रान खान यांना भारताचं उत्तर

PTV हे सरकारी मालकीचे न्यूज चॅनल आहे. १० जूनला या प्रकरणी कारवाई करत दोन पत्रकारांना नोकरीवरुन काढण्यात आले. “या प्रकरणी चौकशीसाठी नेमलेल्या समितीने केलेल्या शिफारशीच्या आधारावर कठोर कारवाई करण्यात आली” असे पीटीव्हीन टि्वट करुन सांगितले. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री फवाद चौधरी आणि मानवी हक्क खात्याच्या मंत्री शीरीन माझारी यांनी कारवाईची मागणी केली होती. पाकव्याप्त काश्मीर आणि अक्साई चीन जम्मू-काश्मीरचा भाग असून हे दोन्ही प्रदेश आपले अविभाज्य अंग असल्याचे भारत मानतो.