कर्तारपूर कॉरिडॉरवरून पाकिस्तानी लश्कराकडून पंतप्रधान इम्रान खान यांचा निर्णय उलटवण्यात आला आहे. पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ता मेजर जनरल आसिफ गफूर यांच्या मते आता भारतातील शीखांना कर्तारपूर कॉरिडोरचा वापर करण्यासाठी भारतीय पासपोर्टची आवश्यकता असणार आहे. विशेष म्हणजे या अगोदर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ट्विटद्वारे घोषणा केली होती की, कर्तारपूर कॉरिडॉरचा वापर करण्यासाठी पासपोर्टची आवश्यकता लागणार नाही. मात्र, आता त्यांच्या या निर्णयाचे पालन होताना दिसत नाही. यावरून पाकिस्तानी लष्कर आणि पंतप्रधान इम्रान खान यांच्यातील दुरावा कितपत वाढला आहे हे स्पष्टपणे जाणवत आहे.

पंतप्रधान इम्रान खान यांनी ट्विटद्वारे म्हटले होते की, ”भारतातून कर्तारपूरला येणाऱ्या शीखांना दोन गोष्टींमध्ये सवलत देण्यात येणार आहे. पहिली त्यांना पासपोर्टची आवश्यकता भासणार नाही, केवळ वैध असणारे एक ओळखपत्र असावे आणि दुसरी म्हणजे त्यांना दहा दिवस अगोदर नोंदणी करण्याची कोणतीही गरज असणार नाही. तसेच, उद्घाटनाच्या दिवशी आणि गुरूनानक देव यांच्या 550 व्या जयंती दिनी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.” असेही त्यांनी म्हटले होते.

कर्तारपूर कॉरिडॉर सुरु झाल्यानंतर पाकिस्तानातील विविध गटांना भारतविरोधी कारवाया करण्यासाठी या कॉरिडॉरचा वापर करु न देणे हे सुरक्षा यंत्रणांसमोर मुख्य आव्हान आहे. कर्तारपूर कॉरिडॉर सुरु करण्यासाठी पाकिस्तानने जी तत्परता दाखवलीय त्यामागे खलिस्तान चळवळीला प्रोत्साहन देण्याचाही त्यांचा हेतू असू शकतो, असा देखील अंदाज वर्तवला जात आहे.

कर्तारपूर कॉरिडॉर उद्घाटनाआधी पाकिस्तानने एक व्हिडीओ जारी केला आहे. प्रसिद्धीसाठी बनवलेल्या या व्हिडीओमधून पाकिस्तानने आगाऊपणा केला आहे. या व्हिडीओमधील एका पोस्टरवर तीन खलिस्तानी फुटीरतवाद्यांचे फोटो आहेत. “खलिस्तान २०२०” असा मजकूरही त्या पोस्टरवर लिहीला आहे. पाकिस्तानच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सोमवारी चार मिनिटांचा हा व्हिडीओ जारी केला.

पाकिस्तानातील गुरुद्वारामध्ये शीख यात्रेकरु दर्शनासाठी जात असल्याचे या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आले आहे. या व्हिडीओमध्ये एक पोस्टर असून खलिस्तानी फुटीरतावादी भिद्रनवाले, मेजर जनरल शाबेग सिंग आणि अमरिक सिंग खालसा यांचा फोटो आहे. भिद्रनवाले दमदामी टकसाळचा प्रमुख होता. मेजर जनरल शाबेग सिंग भारतीय लष्करामध्ये होता. १९८४ साली तो खलिस्तानी चळवळीत सहभागी झाला. अमरिक सिंग खालसा खलिस्तानी विद्यार्थी नेता होता. बंदी घालण्यात आलेल्या अखिल भारतीय शीख विद्यार्थी फेडरेशनचा तो प्रमुख होता. जून १९८४ मध्ये भारतीय लष्कराने केलेल्या ऑपरेशन ब्लू स्टारमध्ये या तिघांचा खात्मा झाला.