पाकिस्तानचा अण्वस्त्र कार्यक्रम धोकादायक असल्याचे अमेरिकेच्या थिंक टँकने म्हटले आहे. पाकिस्तानच्या अण्वस्त्र कार्यक्रमामुळे अणू युद्धाचा धोका असल्याचेही थिंक टँकने अहवालात नमूद केले आहे. अमेरिकन थिंक टॅक अटलांटिक काऊन्सिलने ‘एशिया इन सेकंड न्यूक्लिअर एज’ नावाच्या अहवालातून पाकिस्तानच्या अण्वस्त्र कार्यक्रमाबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

पाकिस्तानने आतापर्यंत त्यांच्या अण्वस्त्र युद्ध योजनेची माहिती जगाला दिलेली नाही. मात्र पाकिस्तानच्या अण्वस्त्र कार्यक्रमामुळे पारंपारिक युद्ध अण्वस्त्र युद्धाकडे जाऊ शकते, असा धोक्याचा इशारा अमेरिकन थिंक टँकने दिला आहे. ‘भारतीय उपखंडातील क्षेत्राला अत्याधुनिक शस्त्रांचा धोका नसून अण्वस्त्रांची सुरक्षा करणाऱ्या यंत्रणांच्या अस्थिरतेचा धोका आहे. पाकिस्तानमध्ये भविष्यात कोणती उलथापालथ घडेल, याचा अंदाज लावणे कठीण आहे,’ असे अमेरिकेच्या थिंक टँकने अहवालात म्हटले आहे.

‘गेल्या चार दशकांपासून दहशतवादाच्या माध्यमातून अफगाणिस्तान आणि भारतात अशांतता पसरण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून करण्यात आला. मात्र या प्रयत्नांचा फटका पाकिस्तानलादेखील बसला. पाकिस्तानच्या अनेक भागांमध्येही दहशतवादी हल्ले झाले आहेत. चिंताजनक बाब म्हणजे, अतिशय संवेदनशील समजल्या जाणाऱ्या लष्करी तळांनाही लक्ष्य करण्यात आले. या भागात पाकिस्तानची अण्वस्त्रे असण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या भागात झालेले हल्ले धोकादायक आहेत. विशेष म्हणजे पाकिस्तानमधील शक्तींनीच हे हल्ले घडवून आणले आहेत,’ असे अमेरिकन थिंक टँकचा अहवाल सांगतो.

पाकिस्तानची अण्वस्त्रे दहशतवाद्यांच्या ताब्यात जाऊ शकतात, अशी भीती अहवालातून व्यक्त करण्यात आली आहे. ‘पाकिस्तानच्या अण्वस्त्रांच्या सुरक्षेचा मुद्दा अतिशय चिंताजनक आहे. त्यांची अण्वस्त्रे विघातक शक्तींच्या हाती जाऊ शकतात. पाकिस्तानी सैन्यातील मतभेदांमुळे असे घडू शकते. पाकिस्तानी सैन्याचे अण्वस्त्रांवर मजबूत नियंत्रण नसल्यामुळेदेखील हे घडू शकते,’ असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.