पाकिस्तानात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत माजी पंतप्रधान नवाझ शरीफ आणि त्यांचे बंधू शाहबाज शरीफ यांच्या उमेदवारीला भ्रष्टाचार प्रतिबंधक ब्युरोने तीव्र हरकत घेतली आहे. शरीफ बंधूंनी बँकेचे ३.४८ अब्ज रुपयांचे कर्ज थकविले असल्याचे ब्युरोचे म्हणणे आहे. नॅशनल अकाऊण्टेबिलिटी ब्युरोने (एनएबी) निवडणूक आयोगाकडे अधिकृतपणे ही हरकत नोंदविली आहे. शरीफ बंधू आणि त्यांच्या नातेवाईकांविरुद्ध रावळपिंडीतील न्यायालयात भ्रष्टाचाराचे तीन खटले प्रलंबित आहेत, असेही एनएबीने म्हटले आहे. हुदाईबिया पेपर मिलसाठी एका बँकेकडून घेतलेले कर्ज शरीफ बंधूंनी थकविले असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्याचप्रमाणे या बंधूंनी पदांचा गैरवापर करून उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतापेक्षा अधिक संपत्ती गोळा केली असल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे. दरम्यान, पीएमएल-एनच्या प्रवक्त्याने या आरोपांचा स्पष्टपणे इन्कार केला आहे. एनएबीने केलेले आरोप दिशाभूल करणारे असल्याचे प्रवक्त्याने म्हटले आहे. एनएबीचे अधिकारी पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या नेत्यांच्या आदेशावरून पीएमएल-एनच्या नेत्यांना लक्ष्य करीत असल्याचेही प्रवक्ता म्हणाला.