पाकिस्तानी सैन्याला कमकुवत करण्यासाठी भारत नवाज शरीफ यांना मदत करत असल्याचा आरोप पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केला आहे. “लष्करावर राजकीय हस्तक्षेपाचा आरोप करून नवाझ शरीफ धोकादायक खेळ खेळत आहेत,” असं इम्रान खान म्हणाले. पाकिस्तानच्या इतिहासात सैन्य आणि सरकारमधील सर्वात चांगले संबंध आपल्या कार्यकाळात असल्याचा दावाही केला. त्यांनी लष्कराचा राजकारणातील हस्तक्षेप आणि भ्रष्टाचार याविरोधात मोहीम सुरू केली आहे. अशा परिस्थितीतच त्यांचं हे वक्तव्य समोर आलं आहे.

“नवाज शरीफ सध्या एक धोकादायक कृत्य करत आहेत. अल्ताफ हुसैन यांनीदेखील असंच केलं होतं. मला शंभर टक्के विश्वास आहे की भारत नवाज शरीफ यांची मदत करत आहे. जर आपलं लष्कर कमकुवत होतं तर त्याचा फायदा कोणाला होईल?,” असा सवालही त्यांनी केला. असे काही नेते आहेत जे नवाज शरीफ यांच्या वक्तव्याशीही सहमत आहेत, असंही त्यांनी निमूद केलं. एका वृत्तवाहिनीशी साधलेल्या विशेष संवादात त्यांनी यावर भाष्य केलं.

“नवाज शरीफ हे लष्करावर हल्लाबोल करण्याची मोठी चूक करत आहेत. त्यांना भारताचं पूर्णपणे समर्थन आहे याची मला खात्री आहे. सरकारनं मानवी दृष्टीकोन बाळगत त्यांना जाण्याची परवानगी दिली होती. परंतु आता ते राजकारण करत आहे. देशाविरोधात कारस्थान करणाऱ्या लोकांचीही ते भेट घेत असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे,” असंही त्यांनी स्पष्ट केलं. लष्कर आणि आपल्यात कोणताही तणाव नाही. जनतेच्या समर्थनातून आपण सत्तेत आलो आहोत. काही चुकांसाठी लष्करावर टीका करणं योग्य नाही. लष्कराचं काम सरकार चालवणं नाही हे पाकिस्तानच्या इतिहासातून दिसून येत आहे. लोकशाहीद्वारे निवडून आलेलं सरकार योग्यरित्या काम करत नसेल तर याचा अर्थ मार्शल लॉ लावावा असा होत नाही. त्यांना आपल्या सुधारणा करण्याची गरज आहे असा त्याचा अर्थ होत असल्याचे इम्रान खान म्हणाले.

गिलगिटमध्ये भारत सक्रिय

“गिलगिट बाल्टिस्तानमध्ये भारत सक्रिय आहे. हा चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोअरचा भाग आहे. या ठिकाणी असलेल्या लोकांना त्यांचे अधिकार हवे आहेत आणि भारत त्याचा फायदा घेत आहे. भारत पाकिस्तानमध्ये शिया सुन्नी हा वाद भडकावत आहे,” असा आरोपही इम्रान खान यांनी यावेळी केला.