अमली पदार्थ तस्कर, करचुकवेगिरी करणारे लोक, भ्रष्टाचारी व्यक्ती यांना काळा पैसा गुंतवण्यासाठीचे नंदनवन अशी पनामाची जी प्रतिमा पनामा पेपर्सच्या प्रकरणानंतर निर्माण झाली आहे, ती खरी नाही. जर कुणी असे काळेधंदे केले असतील तर ते या युक्तया जगातील श्रीमंत देशातून शिकलेले आहेत, त्यात आम्हाला बदनाम करण्याची कारण नाही, असे पनामाने म्हटले आहे.

पनामा पेपर्समधील माहिती फुटल्यानंतर तेथील मोझ्ॉक फोनसेका या कायदा सल्लागार कंपनीचे सहसंस्थापक रॅमन फोनसेका यांनी सांगितले, की आमच्या देशात परदेशातील लोक पैसे ठेवतात याचा काही लोकांना मत्सर वाटतो; विशेष करून पहिल्या जगातील देशांना वाढत्या स्पर्धेत टिकता येत नाही त्यामुळे ते आमच्यावर दोषारोप करीत आहेत. स्पर्धेत सर्वाना सारखी संधी असावी लागते, असेच जर डेलावेरच्या कंपनीने केले असते तर काही झाले नसते, पण ते पनामात घडले म्हणून जगभरातील वृत्तपत्रांनी पहिल्या पानावर बातम्या दिल्या.

पनामा पेपर्समध्ये एकूण १.१५ कोटी कागदपत्रे फुटली आहेत, त्यातून अनेक देशातील बडय़ा व्यक्तींनी परदेशात बोगस कंपन्या व खाती काढून काळा पैसा ठेवल्याची माहिती उघड झाली. पनामा हा देश १९८० पासून काळे पैसे गुंतवणाऱ्यांसाठी नंदनवन आहे. हुकूमशहा मॅन्युअल नोरिगा यांनी कोलंबियातील अमली पदार्थ तस्करांना काळा पैसा गुंतवण्यास मोकळीक दिली होती. त्यात नुसता काळा पैसाच होता अशातला भाग नाही तर कायदेशीररीत्या मिळवलेला पैसाही होता. त्यात पनामा सिटी हे शहर लॅटिन अमेरिकेतील दुबई बनले. पनामामध्ये २१ महापद्म ते ३२ महापद्म डॉलर्स इतका काळा पैसा आहे, असे ब्रिटनच्या टॅक्स जस्टीस नेटवर्कने म्हटले आहे. आर्थिक गोपनीयता निर्देशांकात पनामा तेराव्या क्रमांकावर असून अमेरिका तिसऱ्या क्रमांकावर आहे. येथे ही क्रमवारी उलट पद्धतीने विचारात घेतली जाते, त्यामुळे आर्थिक गोपनीयतेत अमेरिकेपेक्षा पनामा पुढे आहे.

इमेलच्या माध्यमातून ३७०० कंपनी सेवा पुरवठादारांनी १८२ ठिकाणी बोगस कंपन्या काढण्यास मदत केली आहे, त्यात अमली पदार्थ तस्कर व दहशतवादी गटांचाही संबंध आहे.