पनामा पेपर्समध्ये उल्लेख असलेल्या अनेक जागतिक नेत्यांनी काळा पैसा परदेशात ठेवल्यामुळे गदारोळ चालू असताना सर्व आरोप फेटाळताना काहीही चूक केली नसल्याचे म्हटले आहे.

या कागदपत्रात नाव असलेल्या बडय़ा नेत्यांनी सांगितले की, आम्हाला विनाकारण लक्ष्य केले जात असून त्यात काही गैर केलेले नाही. काही देशांनी या प्रकरणी गांभीर्याने चौकशी सुरू केली आहे.

पनामातील मोझ्ॉक फोन्सेका या विधी सल्लागार संस्थेकडील माहिती गोपनीय सूत्रांनी जर्मनीच्या सुडेडॉइश झेटुंग या वृत्तपत्राला दिली असून ती इतर शंभर प्रसारमाध्यम समूहांनाही देण्यात आली.

रशियाने म्हटले आहे की, ही कागदपत्रे म्हणजे अमेरिकेचा कट आहे. अध्यक्ष पुतिन यांच्या निकटच्या मित्राचे परदेशात २ अब्ज डॉलर्स आहेत असे कागदपत्रात म्हटले आहे. पुतिन व आमचा देश, आमची स्थिरता व आगामी निवडणुका यांना लक्ष्य करताना देशात अस्थिरता निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचे क्रेमलिनच्या प्रवक्तयाने सांगितले. यातील अनेक पत्रकार हे आधी अमेरिकी परराष्ट्र कार्यालय, सीआयए व विशेष सेवांमध्ये काम करीत होते असा रशियाचा आरोप आहे. आइसलँडचे पंतप्रधान सिगमुंदूर डेव्हिड गुनालॉसन यांनी राजीनाम्याची मागणी फेटाळली आहे. ते व त्यांच्या पत्नीची ब्रिटिश व्हर्जिन आयलंड्स येथे २००७ मध्ये एक कंपनी होती असे कागदपत्रात म्हटले आहे. संसदेबाहेर काल लोकांचा जमाव जमला होता त्यांच्यावर आधीच अविश्वासाचा ठराव असताना हे आरोप झाल्याने विरोधकांचे फावले आहे.

निराधार आरोप- चीन

पनामा पेपर्समध्ये चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या मेहुण्यासह कम्युनिस्ट पक्षाच्या इतर पदाधिकाऱ्यांवर करण्यात आलेले आरोप निराधार आहेत असे चीनने म्हटले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते होंग लेई यांनी सांगितले की, शक्तिशाली पाश्चिमात्य शक्ती पनामा पेपर्सच्या प्रकरणामागे आहेत. अशा निराधार आरोपांवर आम्ही प्रतिक्रिया देणार नाही.

ग्लोबल टाइम्स या सरकारी वृत्तपत्राने पॉवरफुल फोर्स इज बिहाइंड पनामा पेपर्स या अग्रलेखात म्हटले आहे की, पाश्चिमात्य देशांचे इतर देशांवर उगारण्याचे हे नवीन हत्यार आहे, या अग्रलेखात रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा उल्लेख आहे, पण पनामा पेपर्समध्ये नाव असलेल्या आठ आजी-माजी कम्युनिस्ट पदाधिकाऱ्यांचा उल्लेख नाही. शी जिनपिंग यांचे मेहुणे डेंग जियागुई यांनीही ब्रिटिश व्हर्जिन बेटांवर दोन कंपन्या सुरू केल्याचे पनामा पेपर्समध्ये म्हटले आहे. दरम्यान चीनमध्ये पनामा पेपर्सवर बंदी घालण्यात आली आहे. ही कागदपत्रे किंवा त्याबाबतच्या बातम्या तेथे ऑनलाईन पाहता येत नाहीत.

कॅमेरून यांच्यावर दबाव

ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांच्या कुटुंबीयांची नावे पनामा पेपर्समध्ये आल्याने त्यांच्यावर दबाव वाढला आहे. कॅमेरून यांच्या वडिलांनी परदेशात निधी स्थापन केला होता व तीस वर्षे ब्रिटनमध्ये करचुकवेगिरी केली होती. त्यांच्या कुटुंबातील आणखी कुणाचे पैसे परदेशात आहेत की नाही हे समजलेले नाही. बहामाज येथील ब्लेअरमोअर होल्डिंगची स्थापना त्यांचे वडील इयान कॅमेरून यांच्या नावाने केली होती. तो गुंतवणूक निधी होता व त्यांनी ब्रिटनमधील पैसे त्यात वळवले होते. ती खासगी बाब आहे असे सांगून कॅमेरून यांच्या कार्यालयाने ठोस प्रतिक्रिया दिली नाही.