पनामा पेपर्समधील माहितीनुसार अमेरिकेशी संबंधित जर काही काळय़ा पैशांचे व्यवहार असतील तर त्याबाबत पाठपुरावा केला जाईल, पनामा पेपर्सचा आढावा घेतला जात असून, या प्रकरणाबाबत अमेरिका अनभिज्ञ नाही असे न्याय खात्याचे प्रवक्ते पीटर कार यांनी सांगितले.

सध्या तरी आम्ही काही प्रतिक्रिया देऊ शकत नाही. अमेरिकेशी निगडित काही प्रकरणे असतील व त्यातील आरोप जर विश्वासार्ह असतील तर तर नक्कीच त्यांचा पाठपुरावा केला जाईल, असे ते म्हणाले. कॉन्सोर्टियम ऑफ इनव्हेस्टिगेटिव्ह जर्नालिस्ट्स या संस्थेच्या पत्रकारांनी पनामा पेपर्सच्या माध्यमातून परदेशातील २१४००० बोगस कंपन्यांचा पर्दाफाश केला आहे. पनामा येथील मोझ्ॉक फोनसेका या कायदेशीर सल्ला आस्थापनेची ३५ देशांत कार्यालये असून त्यांच्याकडे असलेली १.१५ कोटी कागदपत्रे उघड झाली आहेत, मात्र त्याचा स्रोत कळू शकलेला नाही. रशिया, चीन, अर्जेटिना व आइसलँड तसेच पाकिस्तान या देशांतील मोठय़ा पदावर असलेल्या राजकीय व्यक्तींचा संबंध या प्रकरणात आहे. नवाझ शरीफ, व्लादिमीर पुतिन, शी जिनपिंग, दिवंगत बेनझीर भुत्तो यांची नावे त्यात आहेत. फ्रान्स, स्पेन व ऑस्ट्रेलिया या देशांनी पनामा पेपर्समधून बाहेर आलेल्या माहितीच्या संदर्भात चौकशी सुरू केली आहे. यूएसए नेटवर्क या दारिद्रय़ विरोधी गटाने असे म्हटले आहे, की अमेरिकेतही बोगस व बेनामी कंपन्या आहेत त्या बंद कराव्यात, कारण त्यामुळे भ्रष्टाचार, दारिद्रय़, मानवी तस्करी व सशस्त्र संघर्ष यांना उत्तेजन मिळत आहे, असे नेटवर्कचे कार्यकारी संचालक  एरिक लेकाम्प्टे यांनी सांगितले.