पनामा पेपर्समध्ये अडकलेले मॉरिसियो मॅक्री यांच्याविरोधात त्यांनी परदेशात जमवलेल्या काळ्या पैशांबाबत चौकशी सुरू करण्यात आली आहे. मॅक्री हे लॅटिन अमेरिकेत उजव्या आघाडीच्या पुनरूत्थानाचे प्रतीक मानले जातात. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन, चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यासह मॅक्री यांचे नावही पनामा पेपर्समध्ये आले आहे. पनामातील मोझ्ॉक फोन्सेका या विधी सल्लागार कंपनीच्या मार्फत अनेक बडे राजकीय नेते, अभिनेते व क्रीडापटू यांनी परदेशात बेनामी मालमत्ता तयार केल्या आहेत. पुतिन व क्षी जिनपिंग यांची नावे थेटपणे या कागदपत्रात नाहीत पण त्यांचे सहकारी व नातेवाईक त्यात गुंतले आहेत. मॅक्री यांचे नाव मात्र थेटपणे या कागदपत्रात आहे. अजेर्ंटिनाचे संघराज्य अभियोक्ता फेडेरिको डेलगाडो यांनी सांगितले की, राष्ट्रीय कर अधिकाऱ्यांकडून व भ्रष्टाचार विरोधी विभागाकडून माहिती मागवण्यास न्यायालयाला सांगण्यात आले आहे.
मॅक्री यांनी ते २००७ मध्ये ब्युनोसआयर्सचे महापौर झाले, तेव्हाही आर्थिक प्रकटनात त्यांची कुठली कंपनी असल्याचे म्हटले नव्हते. गेल्या डिसेंबरमध्ये ते अध्यक्ष झाले तेव्हाही त्यांनी काहीच उघड केले नव्हते. अध्यक्षीय प्रचारात भ्रष्टाचाराविरोधात भूमिका घेणारे मॅक्री आता काळ्या पैशाच्या व्यवहारात सापडले असले तरी त्यांनी आरोपांचा इन्कार केला आहे. माझी आस्थापने कायदेशीर असून ती वडिलांनी स्थापन केलेली आहेत असे ते म्हणाले. पुतिन यांनी या प्रकरणात आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांची थट्टा केली असून ही सगळी माहिती अमेरिकेच्या सांगण्यावरून एका कटाचा भाग म्हणून जाहीर करण्यात आली असे म्हटले आहे.