News Flash

Panama Papers : नव्या पनामा पेपर्समध्ये दोन भारतीय उद्योजकांची नावे?

Panama Papers : पनामा या छोटय़ाशा देशात जगभरातील सुमारे सव्वादोन लाख कंपन्यांचा व्यवहार चालतो.

Panama Papers
Panama Papers प्रतिनिधिक छायाचित्र

नवी दिल्ली : पनामातील करकायदेविषयक सल्लागार कंपनी मोझॅक फोनसेका हिच्या काही ईमेलमधून पूर्वी नोंदणी झालेल्या काही कंपन्यांच्या प्रत्यक्ष लाभधारक मालकांची नावे उघड झाली आहेत. त्यात भारतातील दोन दिग्गज उद्योजकांची नावे असून त्यांच्या अधिकृत प्रवक्त्यांनी मात्र कोणत्याही गैरव्यवहाराचा इन्कार केला आहे.

विशेष म्हणजे एप्रिल २०१६मध्ये पनामा पेपर्स उघडकीस आले. त्यापूर्वीच मोझॅक फोनसेका यांच्या अंतर्गत ईमेलमधून ही नावे समोर आली आहेत.

पनामा या छोटय़ाशा देशात जगभरातील सुमारे सव्वादोन लाख कंपन्यांचा व्यवहार चालतो. अनेक बडय़ा कंपन्यांनी नामधारी उपकंपन्यांची नोंदणी पनामात केली असून त्यातून करचोरीचा मार्ग प्रशस्त केला आहे, हे पनामा पेपर्स प्रसिद्ध होताच उघड झाले. पनामातील करकायदेविषयक सल्लागार कंपनी मोझॅक फोनसेकाचा डेटा चोरीला गेला. त्या डेटातून या गैरव्यवहाराला प्रथम वाचा फुटली होती.

डिसेंबर २००८ मध्ये मोझॅक फोनसेकाने ब्रिटिश व्हर्जिन आयलंडमधील ‘केबीएम ग्लोबल लिमिटेड’ या कंपनीची नोंदणी केली होती. या कंपनीत आणि मोझॅकमध्ये १६ आणि १७ मार्च २०१६ रोजी झालेल्या ईमेल पत्रव्यवहारातून ‘केबीएम’चे थेट लाभधारक मालक म्हणून केविन भारती मित्तल यांचे नाव उघड झाले आहे. केविन हे टेलकॉम क्षेत्रातील दिग्गज उद्योगपती सुनील भारती मित्तल यांचे पुत्र असून ‘हाईक मेसेंजर’चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. या ईमेलमध्ये त्यांचा दिल्लीतील निवासस्थानाचा पत्ताही नोंदला गेला असून थेट लाभधारक मालक म्हणून केविन यांचे नाव प्रकट करण्यात आले आहे.

या कंपनीच्या कोणत्याही अधिकाऱ्याचे नाव देण्यात आलेले नाही. त्यांची मध्यस्थ म्हणून मिनव्‍‌र्हा ट्रस्ट कंपनी लिमिटेडचे नाव देण्यात आले आहे. तिच्याकडे केबीएमचे ९४ समभाग आहेत.

केविन भारती मित्तल यांच्यावतीने कंपनीच्या प्रवक्त्याने ‘इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले की, केबीएम ग्लोबल लि. या कंपनीची २००८मध्ये केविन भारती मित्तल यांनी स्थापना केली आहे. केविन हे ब्रिटिश नागरिक असून अनिवासी भारतीय नागरिकत्वही त्यांच्याकडे आहे. २०११-१२ या वित्तीय वर्षांत तंत्रज्ञान क्षेत्रातील स्टार्टअप उपक्रमासाठी त्यांनी भारतात करभरणा सुरू केला असून त्यांच्या सर्व करविवरणपत्रात केबीएम कंपनीची पूर्ण माहिती आहे. त्यामुळे यात कोणताही गैरव्यवहार झालेला नाही.

मोझ्ॉक फोनसेकाच्या उघड झालेल्या कागदपत्रांत आणखी एक भारतीय उद्योजक जलज अश्विन दाणी यांचे नाव पुढे आले आहे. एशियन पेन्टस या आपल्या घराण्याच्या उद्योगात ते १८ वर्षे कार्यरत होते. एप्रिल २०१७मध्ये त्यांनी या उद्योगातून अंग काढून घेतले होते. पनामा पेपर्सच्या ताज्या गौप्यस्फोटात उघड झालेल्या कागदपत्रांनुसार, दाणी आणि त्यांची पत्नी विता यांनी ब्रिटिश व्हर्जिन आयलॅण्डमध्ये ‘पॉइनसेटिया ग्रुप होल्डिंग्स लि.’ ही कंपनी स्थापन केली. ते सध्या ३८ भारतीय कंपन्यांच्या संचालक मंडळावर आहेत तर त्यांची पत्नी नऊ कंपन्यांच्या संचालक मंडळावर आहे. ‘इलेव्हन स्पोर्टस’ या क्रीडा व्यवस्थापन कंपनीचे अध्यक्षपदही त्यांच्याकडे आहे. एप्रिल ते जुलै २०१६ या कालावधीत कंपनीच्या व्यवस्थापनात बरेच फेरबदल केले गेले, असे नव्या कागदपत्रांतून उघड झाले आहे. या ईमेल पत्रव्यवहारात जलज आणि विता यांच्या पारपत्राच्या प्रती तसेच मुंबईतील निवासस्थानाच्या पत्त्यावरील दूरध्वनी बिले यांचाही समावेश आहे.

जलज दाणी यांनी याबाबत ‘इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले की, आमची कोणतीही गुंतवणूक बेकायदा नाही. आमच्या करविवरणपत्रातही आमच्या सर्व गुंतवणुकीची माहिती स्पष्ट देण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 21, 2018 1:44 am

Web Title: panama papers new records reveal fresh financial secrets of indian clients
टॅग : Panama Papers
Next Stories
1 नरेंद्र मोदी विवाहित; ते माझ्यासाठी प्रभू रामच: जशोदाबेन यांचे आनंदीबेन यांना प्रत्युत्तर
2 शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद
3 जम्मू- काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले सुरुच; पुलवामात एक जवान शहीद
Just Now!
X