News Flash

‘पनामा’ भोवलं! नवाझ शरीफ पंतप्रधानपदावर राहण्यास अपात्र; सुप्रीम कोर्टाचा निर्णय

गुन्हेगारी खटला दाखल करण्याचे आदेश

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ.

पनामा पेपर्स प्रकरण पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना भोवलं आहे. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने शरीफ यांना पदावर राहण्यास अपात्र ठरवले आहे. न्यायालयानं त्यांना या प्रकरणात दोषी ठरवलं आहे. पाच न्यायाधीशांच्या खंडपीठानं हा ऐतिहासिक निर्णय दिला आहे. शरीफ यांच्याविरोधात गुन्हेगारी खटला दाखल करण्यात यावा, असा आदेशही न्यायालयानं दिला आहे.

शरीफ यांच्यावर लंडनमध्ये बेनामी संपत्ती जमवल्याचा आरोप होता. पनामा पेपर प्रकरण उघडकीस आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं चौकशीसाठी संयुक्त समिती स्थापन केली होती. १० जुलैला या समितीनं अहवाल सादर केला होता. त्यात शरीफ यांच्यावर ठपका ठेवला होता.शरीफ कुटुंबीयांच्या व्यावसायिक व्यवहारांचा तपास करणाऱ्या या समितीनं शरीफ यांच्यासह त्यांची मुले हसन व हुसेन आणि मुलगी मरयम नवाझ यांच्याविरुद्ध नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरो अध्यादेश १९९९ खाली भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल करावा, अशी शिफारस केली होती. सर्वोच्च न्यायालयानं आज या प्रकरणी निकाल दिला. शरीफ यांना दोषी ठरवत पाच सदस्यांच्या खंडपीठानं एकमतानं ते पंतप्रधानपदासाठी अपात्र असल्याचा निर्णय दिला. या निकालाचे संकेत न्यायालयानं १८ जुलैलाच दिले होते. नवाझ शरीफ आता पाकिस्तानच्या पंतप्रधानपदावर राहण्यास अपात्र आहेत. त्यांना पंतप्रधानपद सोडावं लागणार आहे, असं न्या. एजाज अफजल खान निकाल देताना म्हणाले.

न्यायालयानं शरीफ यांच्यासह मुले हसन, हुसैन, मरियम यांनाही दोषी ठरवलं असून त्यांच्याविरोधात दाखल प्रकरणांची चौकशी ‘नॅब’ अर्थात नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरोकडे सोपवली आहे. याशिवाय चौकशी समितीद्वारे जमा केलेले सर्व दस्तऐवज सहा आठवड्यांच्या आत ‘नॅब’कडे पाठवण्यात यावीत. तसंच सुनावणी सुरू झाल्यापासून ३० दिवसांच्या आत या प्रकरणी निकाल द्यावा, असे आदेशही नॅबला दिले आहेत.

दरम्यान, पुढील निवडणुका होईपर्यंत सत्ता कुणाकडे सोपवण्यात येईल हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पाकिस्तानात पुढील वर्षी सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. दरम्यान, सर्वोच्च न्यायालय पनामा पेपर्स प्रकरणी निकाल घोषित करणार असल्यानं खबरदारी म्हणून गुरुवारी रात्रीपासूनच इस्लामाबाद आणि रावलपिंडीत हायअलर्ट जारी करण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालय आणि पाकिस्तानी संसदेबाहेर मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2017 12:55 pm

Web Title: panama papers pakistan pm nawaz sharif disqualified from holding office
Next Stories
1 गुजरात निवडणुकांआधीच काँग्रेसला हादरे; आणखी २ आमदारांचे राजीनामे
2 …असं वाटतंय की मी एखादं स्वप्नं पाहतोय; नितीश यांना भेटल्यावर मोदींची प्रतिक्रिया
3 सुषमाजी, तुम्ही आमच्या पंतप्रधान हव्या होतात!; पाकिस्तानी महिलेचं ट्विट
Just Now!
X