पनामा पेपर्समधील माहितीच्या संदर्भात पनामाच्या अधिकाऱ्यांनी बेनामी कंपन्या व खाती काढून देण्यास मदत करणाऱ्या मोझॉक फोन्सेका कंपनीवर पुन्हा छापे टाकले आहेत. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात एक छायाचित्रही प्रकाशित करण्यात आले असून, मोझ्ॉक फोन्सेकातील छाप्यात जप्त केलेली कागदपत्रे वाहनात टाकली जात असताना त्यात दिसत आहे. मोझ्ॉक फोन्सेका कंपनीच्या कागदपत्रांच्या गोदामावर छापे टाकले असून त्याचे वृत्त ‘ला प्रेन्सा’ या वृत्तपत्राने दिले आहे. अभियोक्त्यांनी सांगितले, की छाप्याची प्रक्रिया सुरू असून तपशील देता येणार नाही. छाप्यानंतर मोझ्ॉक फोन्सेकाने म्हटले आहे, की आम्ही चौकशीत सहकार्य करण्यास तयार आहोत. आताच्या छाप्यात जी कागदपत्रे जप्त केली आहेत त्यातील माहिती आधीच्या छाप्यातच त्यांना मिळालेली आहे. त्यात नवीन काही नाही. कंपनीने कागदपत्रांचे श्रेंडिंग म्हणजे बारीक तुकडे केले असून त्याचा फेरवापर केला जाणार आहे. मोझ्ॉक फोन्सेकावर पनामा पेपर्स प्रकरणानंतर हा दुसरा छापा आहे.
१२ एप्रिललाही कंपनीच्या मुख्यालयावर टाकलेला छापा २७ तास चालला होता. अधिकाऱ्यांनी सांगितले, की पहिल्या छाप्यात आरोपांबाबत पुराव्याची कागदपत्रे सापडली नाहीत. किमान १०० सव्‍‌र्हर्स वेगवेगळय़ा पत्त्यांवर दाखवले असल्याचे निष्पन्न झाले आहे. मोझ्ॉक फोन्सेका ही पनामातील विधी सल्लागार कंपनी असून, तेथील दोन वकिलांनी ती जगातील श्रीमंत लोकांना बेनामी खाती व बेनामी मालमत्ता तयार करून देण्यासाठी सुरू केली होती. जर्मन पत्रकारांनी या कंपनीच्या ताब्यातील माहिती मिळवून पनामा पेपर्स उघड केले होते. त्यात राजकीय नेते, प्रसिद्ध व्यक्ती, राजकारणी, क्रीडापटू यांचा त्यात समावेश होता.