News Flash

दहशतवाद्यांशी लढताना पंढरपूरचे मेजर कुणाल गोसावी शहीद

सहा महिन्यापूर्वीच त्यांची नियुक्ती जम्मू-काश्मीर येथे झाली होती.

Kunal Gosavi:जम्मू काश्मीरमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून दहशतवाद्यांशी चकमक सुरु आहे. सीमेवर घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांना भारतीय जवान टिपून मारत आहेत.

जम्मू काश्मीर मधील नागरोटा सांबा सेक्टर येथे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत पंढरपूरचे मेजर कुणाल मुन्नागीर गोसावी यांना वीरमरण आले. पहाटे साडेपाच वाजता दहशतवाद्यांशी लढताना ते शहीद झाले. सहा महिन्यापूर्वीच त्यांची नियुक्ती जम्मू-काश्मीर येथे झाली होती. तीन दिवसांपूर्वी सुटीवरून ते पुन्हा कामावर परतले होते. २८ वर्षीय मेजर कुणाल गोसावी यांच्या मागे आई, वडील सामाजित कार्यकर्ते मुन्नागीर गोसावी, पत्नी उमा, मुलगी उमंग व दोन भाऊ आहेत. चार वर्षांपूर्वी ते सैन्यात दाखल झाले होते. मंगळवारी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत महाराष्ट्राचे दोन वीर शहीद झाले आहेत. नांदेडमधील लोहा तालुक्यातील जानापुरी येथील संभाजी कदम यांनाही वीरमरण आले.
मेजर गोसावी यांनी पंढरपूरमधील कवठेकर प्रशालेत शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी पुणे येथून वाणिज्य शाखेची पदवी घेतली. त्यानंतर सैन्य दलात कॅप्टन म्हणून ते रूजू झाले होते. २६ नोव्हेंबरपर्यंत ते पंढरपुरात होते. दि. २७ रोजी ते कर्तव्यावर रूजू झाले होते. त्यांचे वडील पंढरपूर अर्बन बँकेचे संचालक आहेत.

जम्मू काश्मीरमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून दहशतवाद्यांशी चकमक सुरु आहे. सीमेवर घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांना भारतीय जवान टिपून मारत आहेत. मात्र पोलिसांच्या वेशात शिरलेल्या काही दहशतवाद्यांच्या हल्ल्यात एका अधिकाऱ्यासह तीन जवान शहीद झाले.

जम्मूपासून २० किमी अंतरावर असलेल्या नागरोटा येथे लष्कराच्या १६ व्या कोअरचे मुख्यालय आहे. लष्करासाठी हा अत्यंत संवेदनशील भाग असून या भागाला दहशतवाद्यांनी लक्ष केले होते. लष्कराच्या छावणीवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एक मेजर आणखी एक जवान शहीद झाले. मंगळवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास हा हल्ला झाला होता. दहशतवाद्यांनी आता ग्रेनेड फेकले व नंतर अंदाधुंद गोळीबार केला. हल्ल्यात आणखी जवानही जखमी झाल्याचे वृत्त आहे. या हल्ल्याला भारतीय जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले असून त्यात ४ अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे.
दरम्यान, उरीतील दहशतवादी हल्ल्याला भारताने सर्जिकल स्ट्राइक करुन प्रत्युत्तर दिल्यापासून वारंवार पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. दरम्यानच्या काळात अनेकदा दहशतवाद्यांकडून घुसखोरीचे प्रयत्न केले गेले आहेत. दहशतवाद्यांच्या घुसखोरीवेळी पाकिस्तानी सैन्याकडून भारतीय जवानांच्या दिशेने जोरदार गोळीबार केला जातो आहे. दहशतवाद्यांची घुसखोरी यशस्वी व्हावी, यासाठी पाकिस्तानी सैन्याकडून हरतऱ्हेचे प्रयत्न केले जात आहेत. आतापर्यंत पाकिस्तानने तब्बल २५० हून अधिक वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2016 5:21 pm

Web Title: pandharpurs major kunal gosavi martyr in jammu kashmir
Next Stories
1 सुशील मोदी, तुमच्या बहिणीचे नितीशकुमारांशी लग्न लावून द्या; राबडीदेवींची जीभ घसरली
2 लोकसभेत नवे आयकर विधेयक मंजूर; करचुकवेगिरीविरोधात लढाई तीव्र
3 पंतप्रधानांनी ८ नोव्हेंबरनंतरचाच बँक तपशील का मागवला ?- केजरीवाल
Just Now!
X