देशभरात करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढत आहे. रुग्णांच्या मृत्यचे प्रमाण देखील वाढले आहे. करोनामुळे आरोग्यव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणावर ताण पडला आहे. यामुळे खाजगी रुग्णालयांवर निष्काळजीपणा आणि अधिकचे पैसे घेतले जात असल्याचा आरोप होत आहे. उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे अशीच एक घटना समोर आली आहे. पद्मविभूषण शास्त्रीय गायक पंडित छन्नूलाल यांच्या मुलीचे करोनाने निधन झाले आहे. रुग्णालयाने निष्काळजीपणा केल्याने हा मृत्यू झाल्याचा आरोप छन्नूलाल यांच्या कुटुंबियांनी केला आहे.

काही दिवसांपूर्वीच छन्नूलाल यांच्या पत्नीचे करोनाने निधन झाले होते. त्यानंतर गेल्या आठवड्याच मुलीचे सुद्धा एका खाजगी रुग्णालयात निधन झाले. यानंतर छन्नूलाल यांच्या दुसऱ्या मुलीने रुग्णालयावर निष्काळजीपणा आणि अधिकचे पैसे घेतल्याचा आरोप केला होता. नम्रता यांनी रुग्णालयाचे सीसीटीव्ही फुटेज दाखवण्याची विनंती केली होती. त्यानंतर छन्नूलाल यांच्या मुलीचा पंतप्रधान मोदींनी न्याय मिळवून द्यावा अशी हात जोडून विनंती करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

“माझ्या बहिणीसोबत काय झाले आहे मला सांगा. तडफडून माझ्या बहिणीचा मृत्यू झाला आहे. पंतप्रधानजी तुम्ही माझ्या वडिलांच्या पाया पडायचांत. माझे वडील तुमच्यावर खूप प्रेम करतात. तुम्हाला आशिर्वाद देतात. माझी विनंती आहे की माझ्या बहिणीला न्याय मिळवून द्या माझ्या बहिणीला काय झाले होते, तिच्यावर कोणते उपचार सुरु होते हे आम्हाला सांगा. माझे वडील इथे भांडायला येऊ शकत नाहीत त्यामुळे कोणत्या परिस्थितीमध्ये माझ्या बहिणीचा मृत्यू झाला हे आम्हाला सांगावं. आम्ही तुम्हाला विनंती करत आहोत मोदीजी आम्हाला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे ,” अशा शब्दात नम्रता मिश्रा यांनी पंतप्रधान मोदींकडे विनंती केली आहे. पद्मविभूषण पंडित छन्नूलाल हे मोदींचे समर्थक आहेत.

पद्मविभूषण पंडित छन्नूलाल यांची पत्नी मनोरम आणि मुलगी संगीता यांना करोनाची लागण झाली होती. दोघांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. २६ एप्रिलला पत्नीचे निधन झाल्यानंतर छन्नूलाल यांनी मुलीला पाहण्याची विनंती रुग्णालयाकडे केली होती. मात्र रुग्णालयाने टाळाटाळ करत छन्नूलाल यांना संगीताला पाहू दिले नाही. १ मे ला संगीता निधन झाले. त्यानंतर सोमवारी नम्रता यांनी रुग्णालयाला सीसीटीव्हीचे फुटेज दाखवण्याची विनंती केली होती. रुग्णालयाने याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यानंतर स्थानिक पोलीस याठिकाणी पोहोचले. त्यांच्याकडे रुग्णालयामुळे आपल्या बहिणीचा मृत्यू झाला असल्याची लेखी तक्रार पोलिसांकडे केली. यानंतर हे प्रकरण जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे गेले. जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी याप्रकरणी तीन डॉक्टरांची एक समितीची नेमणूक करत तपास करण्याचे आदेश दिले आहेत.