अफगाणिस्तानातील बंडखोरांचा बालेकिल्ला असलेल्या पंजशीर खोऱ्याच्या मोठ्या भागावर तालिबानने ताबा मिळवण्यास सुरुवात केली आहे. बंडखोरांना पाठिंबा देणाऱ्या लोकांना लक्ष्य केले जात आहे. माजी उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांच्या भावाची तालिबान्यांनी निर्घृणपणे हत्या केली होती. त्यानंतर आता पंजशीर खोऱ्यातून तालिबानचा प्रतिकार करणारा अहमद मसूदही पंजशीर सोडून टर्की येथे पळून गेल्याची माहिती समोर येत होती. त्यानंतर आता अहमद मसूद अद्यापही अफगाणिस्तानात आहे अशी माहिती समोर आली आहे.

पंजशीरच्या ७० टक्के मुख्य भागांवर आता तालिबानचे नियंत्रण आहे. इराणीच्या ‘फार्स’ या वृत्तसंस्थेने काही सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. अहमद शाह मसूदचा मुलगा अहमद मसूद टर्की किंवा इतर कोणत्याही देशात पळून गेल्याच्या अफवा खोट्या आहेत. मसूद हा अफगाणिस्तानातच सुरक्षित ठिकाणी आहे असे या वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

तालिबानने गेल्या आठवड्यात आतापर्यंत अजिंक्य असलेल्या पंजशीर प्रांत ताब्यात घेतल्याचा दावा केला होता. मात्र, तालिबानचा मुकाबला करणाऱ्या बंडखोर लष्कराने राष्ट्रीय विरोध आघाडीने (एनआरएफ) हा दावा फेटाळला. एनआरएफचे नेतृत्व अहमद मसूद आणि अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह करत आहेत. सालेह यांनी स्वतःला अफगाणिस्तानचे काळजीवाहू अध्यक्ष म्हणून घोषित केले होते.

रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत…; पंजशीर मिळवल्याच्या तालिबानच्या दाव्यावर अहमद मसूदची प्रतिक्रिया

मसूदचे निकटवर्तीय कासीम मोहम्मदी यांनी फार्स या वृत्तसंस्थेला याबाबत माहिती दिली आहे.  “अलीकडच्या काळात तालिबानने पंजशीरमध्ये प्रवेश केला आहे आणि आता त्यांनी मुख्य रस्त्यांच्या ७० टक्के भाग व्यापला आहे,” पण पंजशीर खोरे अजूनही पूर्णपणे बंडखोरांच्या नियंत्रणात आहे, असे कासीम मोहम्मदी यांनी म्हटले आहे.

गेल्या बुधवारी, ताजिकिस्तानमधील पदच्युत अफगाणिस्तान सरकारच्या राजदूताने असेही म्हटले होते की अहमद मसूद आणि अमरुल्ला सालेह अफगाणिस्तानातून पळून गेले नाहीत आणि त्यांचे सैन्य अजूनही तालिबानचा सामना करत आहे. राजदूत जहीर अग्बार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की ते सालेहच्या सतत संपर्कात होते आणि ते आणि सुरक्षेच्या कारणामुळे कोणत्याही संपर्कापासून दूर होते.

तालिबानने अमरुल्ला सालेह यांचा भाऊ रोहुल्ला अजीजीला पंजशीरच्या युद्धात ठार केले होते. तालिबानने रोहुल्लाहचा मृतदेह दफन करण्यासही परवानगी दिली ​​नव्हते. रोहुल्ला गेल्या अनेक दिवसांपासून पंजशीरमध्ये तालिबानशी लढत होते.  युनिटचे कमांडर देखील होते. इबदुल्लाह सालेहने रॉयटर्स वृत्तसंस्थेशी बोलताना, तालिबान्यांनी माझ्या मामाची हत्या केल्याचे म्हटले होते.