साहित्यातील कामगिरीसाठी ‘येल’ विद्यापीठाच्या वतीने दिल्या जाणारा ‘विंडहॅम कॅम्पबेल’ साहित्य पुरस्कार कादंबरी सोडून इतर साहित्य प्रकारात भारतीय लेखक पंकज मिश्रा यांना जाहीर झाला आहे. येल विद्यापीठाच्या वतीने दिला जाणारा हा पुरस्कार एकूण आठ लेखकांना दिला जातो. दीड लाख अमेरिकी डॉलर असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. निबंधकार व कादंबरीकार मिश्रा यांची निवड ‘नॉन फिक्शन’ गटात करण्यात आल्याचे ‘येल’ विद्यापीठाने म्हटले आहे. पंकज मिश्रा यांनी अतिशय उच्च दर्जाची साहित्यिक शैली निर्माण केली असून त्यांनी आधुनिक आशियाची उत्क्रांती अतिशय वेगळ्या शैलीत मांडली आहे, असे विद्यापीठाने म्हटले आहे. कादंबरी, नॉन फिक्शन व नाटक या गटातही दीड लाख डॉलरचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
मिश्रा यांच्या ‘रोमॅंटिक्स’ या कादंबरीशिवाय ‘फ्रॉम द रूइन्स ऑफ एम्पायर- द इंटलेक्च्युअल हू रिमेड आशिया’ ही इतर पुस्तके लिहिली आहेत.
२०१४ मध्ये ‘कादंबरी’ गटात अमिनता फोरना (सिएरा लिओन), नदीम अस्लम (पाकिस्तान), जिम ग्रेस ( इंग्लंड), कादंबरी वगळून इतर प्रकारात पंकज मिश्रा (भारत), जॉन व्हॅलन्ट (अमेरिका/कॅनडा), नाटक गटात किया कॉरथ्रॉन (अमेरिका), सॅम होलक्रॉफ्ट (इंग्लंड), नोएली जॅनकझेवास्का ( ऑस्ट्रेलिया) यांचा समावेश आहे. हे पुरस्कार देताना लेखकांना त्यांचे नामांकन झाले आहे हे समजू दिले जात नाही त्यामुळे पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांची भावना आश्चर्याची असते.
सिएरा लिओनच्या अमिनता फोरना यांनी सांगितले की, लोकांच्या अपेक्षा, आर्थिक ताण व कालरेषांच्या सीमा न पाळता आम्ही लिहित जातो. त्यामुळे ‘विंडहॅम कॅम्पबेल’ पुरस्कार मिळणे मोलाचेच आहे.
ब्रिटिश नाटककार सॅम होलक्रॉफ्ट यांनी सांगितले की, आपल्याला हा पुरस्कार मिळाल्याने आश्चर्याचा धक्का बसला असून मी भारावून गेले आहे.
पाकिस्तानी नाटककार नदीम अस्लम यांनी काव्यमय भाषेत प्रतिक्रिया देताना सांगितले की, कलाकार हा पतंग असतो. तो शक्तिशाली लोकांना व अन्यायाला धक्का पोहोचवित असतो.  या लेखकांना १५ सप्टेंबरला हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
लेखनातून चरितार्थ चालवणाऱ्या माझ्यासारख्या मुक्तलेखकाला हा पुरस्कार दिला जात आहे, ही आनंदाची बातमी आहे. दोन कलाकृतींच्या मध्ये काही काळ जातो. आता या पुरस्कारामुळे आणखी कलाकृती सादर करण्याची प्रेरणा मला मिळेल.