अण्णाद्रमुक पक्षाच्या माजी सर्वेसर्वा जयललिता यांच्या मृत्यूची चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी माजी मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम एकदिवसीय उपोषणाला बसले आहेत. तामिळनाडू, पुद्दूचेरी आणि कराईकल याठिकाणीही पनीरसेल्वम यांचे समर्थक उपोषणाला बसणार आहेत. आज सकाळी नऊ वाजता या उपोषणाला सुरूवात झाली असून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत उपोषण सुरू राहणार आहे. अण्णाद्रमुक पक्षातचे पनीरसेल्वम यांचे समर्थक खासदार आणि आमदार या उपोषणात सहभागी झाले आहेत. चेन्नईच्या अपोलो रूग्णालयात ७५ दिवसांच्या उपचारानंतर ५ डिसेंबरला जयललिता यांचे निधन झाले होते. या दरम्यानच्या काळात जयलिलता यांच्या प्रकृतीविषयी कोणालाही फारशी माहिती देण्यात येत नव्हती. त्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये गोंधळाचे वातावरण होते. त्यामुळे  पनीरसेल्वम यांच्यासह अनेकांनी अम्मांच्या मृत्यूबद्दल संशय व्यक्त करत याप्रकरणाची चौकशीची मागणी केली होती. अपोलो रुग्णालयाच्या अहवालात म्हटले होते, की जयललिता यांच्या मृत्यूस अनेक घटक कारणीभूत ठरले, त्यांना अनेक वैद्यकीय समस्या होत्या. अपोलो रुग्णालयाने केलेले उपचार व एम्स रुग्णालयाचा अहवाल यातील माहिती राज्य सरकारने हे आरोप फेटाळून लावले होते. जयललिता यांना सर्वोत्तम औषधे व उपचार देण्यात आले होते. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी अनेक वैद्यकीय समस्या होत्या. ५ डिसेंबर २०१६ रोजी रात्री ११.३० वाजता जयललिता यांचे निधन झाले होते.

तामिळनाडूचे आरोग्य सचिव जे. राधाकृष्णन यांनी सांगितले, की चुकीच्या औषधांमुळे जयललिता यांची प्रकृती आणखी बिघडली हा आरोप खरा नसल्याचे म्हटले होते. अटॉपिक डर्मिटिटिससाठी त्यांना कार्टकिोस्टेरॉइड्स देण्यात आली होती व नंतर त्यांना हायपोग्लायेमिक व हायपरटेन्सिव्ह औषधे दिली गेली. त्यांना डायबेटिस मेलिटस व हायपरटेन्शन असे दोन विकार होते. २२ सप्टेंबर २०१६ रोजी त्यांना रात्री दहा वाजता रुग्णालयात दाखल केले, तेव्हा रुग्णवाहिका त्यांच्या घरी गेली तेव्हा त्यांना श्वास घेता येत नव्हता व ऑक्सिजन कमी पडत होता, त्यांना चक्कर आली होती. चेन्नईतील अपोलो रुग्णालयात ४ डिसेंबरला त्यांना अतिदक्षता विभागात ठेवले असता हृदयविकाराचा मोठा झटका आला होता. जयललिता यांच्या उपचारांबाबत ज्या शंका व्यक्त केल्या जात आहेत, त्यात काही तथ्य नाही, असे एम्सच्या अहवालाच्या आधारे म्हणता येते, असे राधाकृष्णन यांनी सांगितले होते. यात आम्ही काही लपवून ठेवलेले नाही, अहवालात सगळे  स्पष्ट केलेले आहे. हृदयविकारानंतर त्यांना एक्स्ट्राकॉरपोरियल मेमब्रेन ऑक्सिजनेशन देण्यात आले होते, त्यांना वाचवण्यासाठी वैद्यकीय सोपस्कारांप्रमाणे सर्व प्रयत्न केले होते, असा दावा राधाकृष्णन यांनी केला होता.