अभाअद्रमुक पक्षाच्या नेत्या जयललिता यांचे कट्टर समर्थक ओ. पन्नीरसेल्वम यांनी सोमवारी तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील ३० मंत्र्यांचा शपथविधी सोहळ्यात नेहमीचा उत्साह नव्हता, तर भावनिक वातावरण होते. शपथ घेताना मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांचे डोळे पाणावले होते.
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात जयललिता यांना दोषी ठरविण्यात आल्याने त्यांचे राजकीय वारस म्हणून पन्नीरसेल्वम यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ देण्यात आली. राज्यपाल के. रोसय्या यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली तेव्हा पन्नीरसेल्वम यांचे डोळे पाणावल्याचे दिसत होते.
बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याप्रकरणी जयललिता यांना दोषी ठरवून त्यांना चार वर्षांच्या कैदेची शिक्षा ठोठावण्यात आल्याने त्यांच्या परतीचे मार्ग बंद झाले असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच शपथविधी समारंभाच्या वेळी वातावरण भावनिक होते. शपथ घेताना पन्नीरसेल्वम यांनी जयललिता यांचे छायाचित्र समोर ठेवले आणि मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
 यापूर्वीही सर्वोच्च न्यायालयाने जयललिता यांच्याविरोधात निकाल दिल्यावर पन्नीरसेल्वम यांनी मुख्यमंत्रिपद सांभाळले होते.
जयललिता यांच्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांचा समावेश नव्या मंत्रिमंडळात करण्यात आला असल्याचे सूत्रांनी सांगितले.
अटकेनंतर १६ मृत्यू
जयललिता यांना कारावासाची शिक्षा ठोठावण्याचा प्रकार सहन न झाल्याने शनिवारपासून तामिळनाडूच्या विविध भागांत १६ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. अभाअद्रमुकचे कार्यकर्ते एस. वेंकटेशन (६५) यांनी स्वत:वर रॉकेल ओतून पेटवून घेतले. अत्यंत गंभीर भाजलेल्या वेंकटेशन यांचे हॉस्पिटलमध्ये निधन झाले. तर अन्य तिघांनी गळफास लावून आत्महत्या केली. एका कार्यकर्त्यांने धावत्या बससमोर उडी टाकून आत्महत्या केली. अन्य दहा जणांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे सरकारी  सूत्रांनी यावेळी सांगितले.