विवेकवादी विचारवंत व डाव्या पक्षांचे नेते गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणाचा तपास करण्यात यंत्रणांना यश येत असून गोव्यात २००९ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाचे फरारी संशयित पानसरेंच्या हत्येतील मुख्य सूत्रधार असल्याचे समोर येत आहे.
गोव्यातील मडगाव येथे २००९ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात हात असल्याबाबत सनातन संस्थेशी संबंधित दोघे फरारी आहेत. पानसरे हत्या प्रकरणात यापैकी एक मुख्य सूत्रधार असल्याचा संशय विषेश तपास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. रुद्र पाटील आणि सारंग अकोलकर अशी या संशयितांची नावे आहेत. यापैकी रुद्र हा मुख्य सूत्रधार असल्याचा संशय आहे. रुद्रला अटक करण्यासाठी पोलिसांनी शोध सुरू केला असून त्याची माहिती एसआयटीने प्रसिद्ध केली असल्याचे कोल्हापूरच्या पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
यापूर्वी अटक करण्यात आलेला संशयित समीर गायकवाड हा रुद्र आणि मुंबईतून ताब्यात घेतलेल्या मैत्रिणीच्या सतत संपर्कात असल्याचे त्याच्या भ्रमणध्वनीच्या संभाषणावरून पुढे आले आहे. गोव्यातील बॉम्बस्फोटात जखमी झालेल्या गोंडा पाटीलचा रुद्र हा चुलत भाऊ आहे. तसेच तो कट्टर उजव्या विचारसणीचा पुरस्कर्ता असून २००९ पासून फरार आहे. रुद्रची पत्नी प्रीती पाटील ही वकील आहे व ती गायकवाडचा खटला लढणार आहे. तिला कोल्हापूर बार असोसिएशनने काढून टाकले असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.
एनआयएने फरार घोषित केलेल्या रुद्र पाटीलला सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी निदरेष असल्याचे म्हणत आपले कार्यकर्ते रुद्रच्या पाठी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे सांगितले आहे. पानसरे यांच्या हत्या प्रकरणात सनातन संस्थेचा समीर गायकवाड याला अटक करण्यात आली आहे व पोलीस जाबजबाब घेत आहेत. १६ फेब्रुवारी २०१५ रोजी पानसरे यांची मोटारसायकलवरून आलेल्या दोन जणांनी कोल्हापूर येथे हत्या केली होती. त्या हल्ल्यात ते जखमी झाले होते व नंतर त्यांचे मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले होते. त्यांच्या पत्नी मात्र या हल्ल्यातून बचावल्या पण त्यांना गंभीर दुखापत झाली होती.
आरोपींवर कठोर कारवाई -किरन रिजीजू
विवेकवादी विचारवंत व डाव्या पक्षांचे नेते गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणात सामील असलेल्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली जाईल, असे केंद्रीय गृह राज्यमंत्री किरन रिजीजू यांनी सोमवारी सांगितले. या हत्या प्रकरणात उजव्या गटाशी संबंधित लोकांची नावे पुढे आली आहेत. जर विवेकवादी कार्यकर्त्यांना छळले जात असेल, त्यांना ठार केले जात असेल तर ती गंभीर बाब आहे. यात एखादा गट सामील असल्याचे पुरावे असतील तर कठोर कारवाई केली जाईल यात शंका नाही, असे एका कार्यक्रमाच्या पाश्र्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 22, 2015 3:31 am