सचिन वाझे यांच्या अटकेनंतर राजकीय धुरळा बसत असतानाच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी टाकलेल्या लेटरबॉम्बने राजकीय भूकंप झाला. मागील तीन चार दिवसांपासून या पत्राचे पडसाद उमटत असून, भाजपा सातत्याने नवनव्या गोष्टींचा खुलासा करताना दिसत आहेत. यातच आता भाजपाचे माजी उपमुख्यमंत्री आणि खासदार सुशील कुमार मोदी यांनी धक्कादायक दावा केला आहे.

परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. १०० कोटींच्या वसूलीच्या टार्गेटबरोबरच मोहन डेलकर प्रकरणातही दबाब टाकल्याचं परमबीर सिंग यांनी म्हटलेलं आहे. सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पाठवलेल्या पत्राने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. यावरून भाजपा सातत्याने ठाकरे सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य करत आहे. त्यात आता बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे खासदार सुशीलकुमार मोदी यांनी नवीन दावा केला आहे.

“अराजकासारखी परिस्थिती निर्माण झालेली असून, संपूर्ण सरकार अनिल देशमुख यांना वाचवण्यात लागलेली आहे. अनिल देशमुख यांच्यावर कारवाई केली तर ते अशी एखादी गोष्ट बोलून जाऊ नये, ज्यामुळे संपूर्ण सरकारचं अडचणीत येईल, अशी भीती उद्धव ठाकरे यांच्या मनात भीती आहे,” असं सुशीलकुमार मोदी यांनी म्हटलं आहे.

परमबीर सिंग यांच्या पत्रानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज ठाकरे सरकारविरोधात आणखी गौप्यस्फोट केले. पोलीस बदल्यांचं रॅकेट कार्यरत होतं. त्यासंदर्भात फोन टॅपिंग करण्यात आलं. मात्र, सरकार वाचवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फोन टॅपिंग प्रकरणावर पांघरूण घातलं, असा दावा फडणवीस यांनी केलेला आहे. त्याचबरोबर या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केंद्रीय गृहसचिवांकडे करणार असल्याचं फडणवीसांनी म्हटलं आहे. त्यामुळे ठाकरे सरकार काय भूमिका मांडणार हे महत्त्वाचं ठरणार आहे.