परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बमुळे राज्यात खळबळ माजली असताना आता त्यांनी न्याय्य चौकशीच्या मागणीसाठी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मात्र, आपल्या बदलीविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमध्ये अजून एक गंभीर दावा त्यांनी केला आहे. “दादरा नगर हवेलीचे दिवंगत खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्या प्रकरणात काही भाजपा नेत्यांना अडकवण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा दबाव होता”, असा दावा परमबीर सिंग यांनी आपल्या याचिकेमध्ये केला आहे. त्यामुळे आता या मुद्द्यावरून भाजपाकडून अधिक आक्रमक भूमिका घेतली जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.

काय आहे परमबीर सिंग यांच्या याचिकेत?

मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून होम गार्डमध्ये करण्यात आलेली बदली अन्याय्य असून महाराष्ट्र सरकारने जारी केलेले बदलीचे आदेश रद्द करावेत, अशी मागणी करणारी याचिका परमबीर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात केली आहे. यामध्ये त्यांनी अनिल देशमुखांवर निशाणा साधण्यासाठी मोहन डेलकर प्रकरणाचा देखील उल्लेख केला आहे. “प्राथमिक चौकशीनंतर या प्रकरणात सखोल तपास सुरू करण्यात आला. मात्र, या प्रकरणात भाजपाच्या काही नेत्यांची चौकशी करण्यासाठी आणि त्यांना या प्रकरणात अडकवण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून वारंवार दबाव टाकला जात होता. या संपूर्ण प्रकरणाला राजकीय वळण देण्यासाठी दबाव टाकला जात होता. मात्र, याचिकाकर्ते (परमबीर सिंग) या दबावाला बळी पडले नाहीत”, असं याचिकेमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

 

१९८८च्या बॅचचे आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांची अँटिलियाबाहेर सापडलेल्या जिलेटिनच्या कांड्या आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाशी संबंधित सचिन वाझे या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून होम गार्डला बदली करण्यात आली. यानंतर परमबीर सिंग यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून गंभीर आरोप केले आहेत. यामध्ये गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंना मुंबईतील हॉटेल, रेस्टॉरंट्समधून महिन्याला ४० ते ५० कोटी आणि इतर मार्गांनी उरलेले असे एकूण १०० कोटी रुपये जमा करण्याचं टार्गेट दिलं होतं, असा गंभीर आरोप आहे. या प्रकरणावरून सध्या राज्यातलं वातावरण चांगलंच तापलं आहे.

परमबीर सिंह यांची सुप्रीम कोर्टात धाव; अनिल देशमुखांविरोधात सीबीआय चौकशीची मागणी