सोशल मीडियावर बीएसएफ जवानाचा व्हिडीओ ‘व्हायरल’ झाल्यानंतर देशभर खळबळ माजली असतानाच, लष्करातील शिस्त अबाधित राखण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने दिशानिर्देश जारी केले आहेत. निमलष्करी दलाच्या जवानांना सोशल मीडियाचा वापर करण्यास बंदी घालण्यात आली आहे. विशेष म्हणजे जवानांच्या काही तक्रारी असल्यास थेट मला सांगा, असे आवाहन काल, शुक्रवारी लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी केल्यानंतर गृहमंत्रालयाने जवानांच्या सोशल मीडियावरील वापराला चाप लावला आहे. दरम्यान, जवानांच्या स्मार्ट फोनच्या वापरावर कोणतीही बंदी घालण्यात आली नाही, असे लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी स्पष्ट केले आहे.
Aisa kuch nahi hai: Army Chief General Bipin Rawat on reports of smartphones being banned for Army personnel
— ANI (@ANI_news) January 14, 2017
बीएसएफच्या तेज बहादूर यादव या जवानाने जवानांना निकृष्ट जेवण दिले जात असल्याची व्यथा मांडणारा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला होता. या व्हिडीओनंतर एकच खळबळ उडाली होती. याबाबत चौकशी करण्याचे आदेशही पंतप्रधान कार्यालयाने गृहमंत्रालयाला दिले होते. तसेच अहवालही मागवला होता. मात्र, यादव याच्या तक्रारीत काहीही तथ्य नाही, असा अहवाल गृहमंत्रालयाने दिला होता. याशिवाय शुक्रवारी नवनियुक्त लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी जवानांच्या काही तक्रारी असल्यास त्यांनी थेट मला सांगावे, असे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला काही तास उलटत नाहीत तोच केंद्रीय गृहमंत्रालयाने नवीन दिशानिर्देश जारी करत, निमलष्करी दलातील जवानांच्या सोशल मीडियाच्या वापराला बंदी घातली आहे, असे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. नव्याने जारी केलेल्या दिशानिर्देशांनुसार, कोणत्याही जवानाला विनापरवानगी छायाचित्र अथवा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करता येणार नाही. जर एखाद्या जवानाला ट्विटर, फेसबुक, व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम यांसारख्या सामाजिक माध्यमांच्या मंचावर छायाचित्र अथवा व्हिडीओ टाकायचा असल्यास संबंधित दलाच्या महासंचालकांकडून परवानगी घ्यावी लागेल. दरम्यान, लष्करातील जवानांमध्ये शिस्त राखली जावी, यासाठी गृहमंत्रालयाने दिशानिर्देश जारी केले आहेत. मात्र, व्यक्तिगत पोस्ट करण्यास कोणतीही बंदी नाही, असे केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी स्पष्ट केले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 14, 2017 11:53 am