राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी अभिनेता परेश रावल, टेनिसपटू लिएंडर पेस व लेखक रस्किन बाँड यांच्यासह ५६ जणांना ‘पद्म’ पुरस्कार प्रदान केले.
क्रिकेटपटू युवराज सिंग, लेखिका अनिता देसाई व चित्रकार सुनील दास या कार्यक्रमास अनुपस्थित होते. या वेळी अभिनेता परेश रावल यांनी सांगितले की, पद्मश्रीने सन्मानित होत असल्याबद्दल आनंद वाटला. रावल हे अहमदाबाद पूर्व मतदारसंघात भाजपचे उमेदवार आहेत.
 राष्ट्रपतींनी १ पद्म विभूषण, ११ पद्मभूषण व ४४ पद्मश्री पुरस्कार राष्ट्रपती भवनात प्रदान केले. योग गुरू बेल्लूर कृष्णम्माचातर सुंदरराजा अय्यंगार यांना योगाचा जागतिक पातळीवर प्रसार केल्याबद्दल ‘पद्मविभूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. लिएंडर पेस, वैज्ञानिक पी. बलराम, न्या. दलवीर भंडारी, लेखक रस्किन बाँड, विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे टी. रामस्वामी यांना ‘पद्मभूषण’ प्रदान करण्यात आले. व्यवस्थापन गुरू मृत्युंजय अत्रेय, कृषी वैज्ञानिक मदाप्पा महादेवप्पा, अंतराळ आयोगाचे अध्यक्ष के . राधाकृष्णन, मलेरिया संशोधन संस्थेचे संस्थापक संचालक विनोद प्रकाश शर्मा, शिक्षण तज्ज्ञ गुलाममहंमद शेख यांना ‘पद्मभूषण’ने गौरवण्यात आले.  
शिक्षणतज्ज्ञ व गुजराती विश्वकोषाचे संस्थापक धीरूभाई प्रेमशंकर ठाकर यांना ‘मरणोत्तर पद्मभूषण’ प्रदान करण्यात आले. दिवंगत सरन्यायाधीश जे.एस. वर्मा यांच्या कुटुंबीयांनी ‘पद्म’ पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला.  ‘पद्मश्री’ प्रदान केलेल्यात नाटककार महंमद अली बेग, लोककलाकार मुसाफिर राम भारद्वाज, सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ इंदिरा चक्रवर्ती, अंतराळ वैज्ञानिक एम. चंद्रनाथन व माजी महिला क्रिकेट कर्णधार अंजुम चोप्रा, विवेकवादी सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र दाभोलकर (मरणोत्तर) यांचा समावेश होता. कवी केकी दारूवाला, बंगाली अभिनेत्री सुप्रिया देवी, गिर्यारोहक लवराज धरमशक्तू, तबलावादक विजय घाटे, सांख्यिकी संस्थेचे प्राध्यापक जयंतकुमार घोष, सामाजिक कार्यकर्ते मुकुल चंद्रा गोस्वामी, दिल्लीच्या कर्करोग संस्थेचे राजेश कुमार ग्रोव्हर, नेत्रतज्ज्ञ आमोद गुप्ता, रसायनशास्त्रज्ञ रामकृष्ण होसूर, शल्यविशारद टी.पी.जेकब, सामाजिक कार्यकर्ते मनोरमा जाफा, युनानी औषध तज्ज्ञ हकीम सय्यद खलीफतुल्ला , कर्करोतज्ज्ञ ललितकुमार, अ‍ॅनिमेशन तज्ज्ञ राम मोहन, ह्रदयविकार तज्ज्ञ नितीश नायक, टोकियो विद्यापीठाचे भारतीय तत्त्वज्ञान विद्वान सेंगाकू मायेदा, द एम्परर ऑफ मेलडिज- ‘अ बायोग्राफी ऑफ कॅन्सर’ या पुस्तकाचे लेखक सिद्धार्थ मुखर्जी यांना ‘पद्मश्री’ने गौरवण्यात आले. स्त्रीरोगतज्ज्ञ सुभद्रा नायर, कथक नृत्यांगना राणी नायक, वनस्पती जीवशास्त्रज्ञ अजयकुमार परिदा यांना ‘पद्मश्री’ ने सन्मानित करण्यात आले.