सध्या तरुणाईला पबजी या ऑनलाइन गेमने अक्षरश: वेड लावले आहे. शाळेत जाणाऱ्या मुलांपासून ते अगदी नोकरी करणाऱ्या वर्गापर्यंत सर्वांनाच या गेमने वेड लावले आहे. मुले दिवसभर या गेममध्ये रमत असल्याने पालकांची चिंता वाढली आहे. मंगळवारी पार पडलेल्या ‘परीक्षा पे चर्चा-२’ या कार्यक्रमातही एका पालकाने यासंदर्भात थेट मोदींसमोर गाऱ्हाणे मांडले. महिलेने ऑनलाइन गेमसंदर्भात प्रश्न विचारताच मोदींनी ‘तुमचा मुलगा पबजी खेळतोय का, फ्रंटलाइनवाला आहे का?’, असा प्रतिप्रश्न करताच सभागृहात हशा पिकला होता.

मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘परीक्षा पे चर्चा-२’ पार पडला. हा कार्यक्रम दूरचित्रवाणी वाहिन्यांसह फेसबुक लाइव्हद्वारे प्रसारित करण्यात आला. या कार्यक्रमात देशभरातून व्हिडिओ कॉन्फरन्सिगद्वारे विद्यार्थी व पालकांशी मोदींनी संवाद साधला. मूळच्या आसामच्या आणि सध्या दिल्लीत राहणाऱ्या मधुमिता सेन गुप्ता यांनी देखील मोदींना प्रश्न विचारला. ‘माझा मुलगा नववीत शिकत असून तो आधी अभ्यासात चांगला होता. पण हल्ली तो ऑनलाइन गेम्समध्ये रमू लागल्याने त्याचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत आहे, यावर तोडगा काय?’, असा प्रश्न गुप्ता यांनी मोदींना विचारला.

यावर मोदी म्हणाले, तो पबजी खेळतो का?, फ्रंटलाइनवाला आहे का?. मोदींचा हा प्रतिप्रश्न ऐकून सभागृहात हशा पिकला. मोदींनी पुढे यासंदर्भात मोलाचा सल्लादेखील दिला. ‘तंत्रज्ञानाचा जसा फायदा आहे, तसा तोटा देखील आहे. तुमचा मुलगा मोबाइलवर गेम खेळत असेल तर त्याला याच मोबाइलद्वारे माहिती मिळवता येते हे पटवून द्यावे. एखाद्यावेळी त्याला नागालँडमधील तांदळाविषयी इंटरनेटवर माहिती शोधायला सांगावी. यामुळे मोबाइलवर चांगल्या गोष्टींचीही माहिती मिळते हे त्याला कळेल. पुढे जाऊन हेच तंत्रज्ञान तुम्हाला आणि मुलाला जोडेल, असेही मोदींनी सांगितले. प्ले स्टेशन चांगले असतात पण मैदानावरील खेळांना कधीच विसरु नये, असेही त्यांनी नमूद केले.

तंत्रज्ञानाचा वापर हा प्रेरणा देण्यासाठी करावा, पण प्रत्यक्षात त्याचा वापर कशासाठी होत आहे, याकडे आपण लक्ष दिले पाहिजे. तंत्रज्ञानामुळे तुमचे विचार संकुचित झाले तर तुमचं नुकसान होईल. त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर आपण विस्तारासाठी करावा, असा सल्ला त्यांनी दिला.