‘शार्ली एब्दो’ साप्ताहिकावर बुधवारी झालेल्या भीषण दहशतवादी हल्लाप्रकरणी शेरीफ आणि सईद कुरेशी या फ्रान्समधील दोघा भावांचा शोध सुरू आहे.
या दोघा भावांचाच या हल्ल्यात सहभाग आहे का, याबाबत पॅरिसच्या पोलिसांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र उत्तर फ्रान्समध्ये जोरदार शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे. या दोघांची छायाचित्रेही गुरुवारी जारी करण्यात आली असून हे दोघे धोकादायक आहेत तसेच सशस्त्र आहेत, त्यांच्यापासून सावध राहावे तसेच ते कुठेही आढळले तरी पोलिसांना तात्काळ माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
शेरीफ हा ३२ वर्षांचा असून दहशतवादी कृत्यांसाठी २००८मध्ये त्याला १८ महिन्यांचा तुरुंगवास ठोठावण्यात आला होता. इराकमधील अमेरिकन सैनिकांविरोधात लढण्यासाठी तो जाणार होता, असे उघड झाले होते. या दोघांवर गुप्तचर खात्याची नेहमीच नजर असली तरी कालपासून त्यांचा ठावठिकाणा नसल्याने पोलिसांचा संशय बळावला आहे.