सीसीटीव्ही चित्रणातील माहिती ल्ल बुधवारी स्फोट करणाऱ्या महिलेची ओळख पटली
पॅरिसमधील हल्ल्याच्या बुधवारच्या छाप्यात ठार झालेला सूत्रधार अब्देलहमीद अबौद ज्या दिवशी हल्ला झाला त्या दिवशी रात्री पॅरिस मेट्रोमधून प्रवास करीत असतानाचे चित्रण झाले आहे. सीसीटीव्ही चित्रणात तो दिसत आहे. पोलिसांना ज्या ठिकाणी मोटार सापडली होती त्या स्टेशनजवळ तो मेट्रोत चढला असावा, पॅरिसमधील त्या हल्ल्यात १२९ जण ठार झाले होते व तो हल्ला आयसिसने केला होता. दरम्यान बुधवारी आत्मघाती स्फोट करणाऱ्या महिलेची ओळख पटली असून ती अबौद याची चुलतबहीण हसना अबौलाचेन होती तिचा पासपोर्ट सापडला असून तिच्या बोटांच्या ठशावरून ओळख पटली आहे.
मॉँट्रेउल येथे काळे आसन असलेली मोटार सापडली होती, हत्याकांडाच्या ठिकाणी एकूण तीन मोटारी सापडल्या, त्यात ही एक मोटार होती. हल्लेखोरांनी बार व रेस्टॉरंटसवर हल्ल्यासाठी याच मोटारींचा वापर केला होता. पॅरिसचे अभियोक्ते फ्रँकॉइस मॉलिन्स यांनी सांगितले की, या आठवडय़ात त्या मोटारी जप्त करण्यात आल्या असून त्या बेल्जियममधून हल्ल्यासाठी आणल्या होत्या. त्यात पोलो व क्लिओ या मोटारींचा समावेश होता. या मोटारी ब्राहिम व सलाह अब्देसलम यांच्याकडून भाडय़ाने घेतल्या होत्या ते दोघे बेल्जियमचे राहणारे होते. ब्राहिम याने बोलवार्ड व्हॉल्टेअर येथे बारच्या बाहेर आत्मघाती स्फोटात स्वत:ला उडवून दिले होते. हे दोघे भाऊ हल्ल्यात सामील होते असे मानले जाते. रेस्टॉरंटवर गोळीबार करणाऱ्यात त्यांचा हात होता व त्यांच्यातील तिसरी व्यक्ती म्हणजे अबौद हा होता. पोलो गाडी बटाक्लान संगीत मैफल केंद्राच्या बाहेर सापडली होती व तेथील हल्ल्यात ८९ जण ठार झाले होते.

महिलेच्या निवासस्थानी छापे
दरम्यान, फ्रान्सच्या पोलिसांनी बुधवारी छाप्याच्या वेळी आत्मघाती स्फोटात स्वत:ला ठार करणाऱ्या महिलेच्या निवासस्थानी शुक्रवारी छापे टाकले. सेंट डेनिस येथे पोलिसांनी छापा टाकला असता त्या महिलेने आत्मघाती स्फोट केला होता. त्यात सूत्रधार अबौदही ठार झाला असे नंतर जाहीर करण्यात आले होते. मरण पावलेली महिला ही अबौदची चुलतबहीण होती व ती अंदाजे २६ वर्षांची होती. तिच्या आईचे जाबजबाब घेण्यात आले असता मूलतत्त्ववाद्यांनी तिचे काही महिन्यात मतपरिवर्तन केल्याची कबुली तिने दिली. तिच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार तिचे मतपरिवर्तन केल्यानंतर ती निकाब परिधान करीत होती. तिने कधीही कुराणाचा अभ्यास केल्याचे मी पाहिले नव्हते. ऑलने सोस बॉइस येथे तिच्या घरावर छापे टाकण्यात आले होते. शेजारच्या सर्व भागास पोलिसांनी कडे केले होते. कुणालाही आतबाहेर जाऊ दिले जात नव्हते, ती तिच्या आई व इतर भावंडांसमवेत राहत होती. ड्रॅन्सी नावाच्या शहरातील मित्राबरोबर राहायचे तिने ठरवले होते व बुधवारी मी दूरचित्रवाणी संच लावला तेव्हा तिने आत्मघाती स्फोटात स्वत:ला उडवून दिल्याचे समजले असे तिचा भाऊ म्हणाला. माजी बसचालक असलेला सामी अमीमोर याने इतर दोघांसह संगीत केंद्रात स्फोट केला होता, त्यात ८९ जण ठार झाले होते. त्याच्या वडिलांच्या घरीही क्रूटझवाल्ड येथे पोलिसांनी छापे टाकले.

गेल्या आठवडय़ातील दहशतवादी हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर पॅरिसमध्ये शुक्रवारी मुस्लिम प्रार्थनास्थळाबाहेर सुरक्षा दलांनी पहारा ठेवला होता. फ्रान्सने युरोपीय महासंघाला सदस्य देशांच्या सीमांवर गस्त अधिक सतर्क करून धार्मिक कट्टरवाद्यांना रोखण्याचे आवाहन केले आहे.