पॅरिसमध्ये हल्ल्यांचा कट रचणारा अब्देलहमीद अबौद हा मोरोक्को देशातील वंशाचा बेल्जियन रहिवासी असून त्याचा शोध घेतला जात आहे. आतापर्यंत काही व्हिडीओ सापडल्या असून तो युरोपमध्ये हल्ल्याचा कट आखताना त्यात दिसत आहे. अवघ्या २८ वर्षांचा अब्देलहमीद अबौद सध्या सीरियात असल्याचे सांगण्यात येते.
जानेवारीत पूर्व बेल्जियममध्ये वेरवियर्स येथे जिहादी अतिरेक्यांवर पोलिसांनी छापे टाकले होते त्या वेळी तो पळाला व नंतर सीरियात आयसिसच्या बाजूने लढत आहे. फ्रान्समध्ये आतापर्यंत झालेले हल्ले व आताचा हल्ला यातील संबंध पोलिस शोधत आहेत. अबौद हा सीरियात आयसिसच्या अधिपत्याखालील भागात वास्तव्यास आहे. जुलैत त्याला त्याच्या अनुपस्थितीत बेल्जियम न्यायालयाने २० वर्षे तुरूंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. तो त्याच्या भावाच्या संपर्कात असतो. अबौद व सलाह अब्देसलाम हे एकमेकांना ओळखतात व ते इतर छोटय़ा गुन्ह्य़ांमध्ये सामील होते. ब्राहिम अब्देसलाम व अबौद यांचा संबंध असल्याचे मोठे वृत्त बेल्जियमच्या ‘द स्टँडर्ड’ या वृत्तपत्राने दिले आहे. अब्देसलाम व अबौद हे काही काळ ब्रुसेल्समधील मोलेनबीक जिल्ह्य़ात वास्तव्यास होते.
हा जिल्हा आयसिसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. अबौद हा जानेवारीत वेवियर्स येथे टाकण्यात आलेल्या छाप्यानंतर बेपत्ता आहे. शार्ली हेब्दो व ज्यू सुपरमार्केटवरील हल्ल्यानंतर अबौदने पॅरिसमधील पोलिस अधिकाऱ्यांना ठार करण्याचा कट रचला होता. दाबिक या आयसिसच्या नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत अबौद याने सीरियात परत आल्याचे म्हटले होते, नियतकालिकात त्याचे नाव अबू उमर अल बालजिकी असे दिले असले तरी तो अबौदच असून त्याने म्हटले होते की, माझे नाव व चित्रे जगभरातील बातम्यात येत आहेत, तरी मी मायभूमीत राहून कारवाया करीत आहे. जानेवारीत बेल्जियममधील छाप्यात मृत्यू पावलेल्या दोन जिहादींसह तो आधी सुरक्षितपणे त्याच देशातून कारवाया करण्याच्या प्रयत्नात होता.

फ्रेंच पोलिसांचे १२८ ठिकाणी छापे
पॅरिस : फ्रेंच पोलिसांनी पॅरिस हल्ल्यांच्या संदर्भात आज सकाळी १२८ ठिकाणी छापे टाकले असून सीरियातील इस्लामी स्टेटच्या छावण्यांवर हल्ले तीव्र केले आहेत. फ्रान्स व बेल्जियमच्या अधिकाऱ्यांनी हल्लेखोरांना पकडण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून त्यांचे साथीदारही पकडण्याचा प्रयत्न आहे.
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी सांगितले, की हे हत्याकांड ज्यांनी केले ते मनोविकारी राक्षस आहेत, असेच म्हणावे लागेल, या दहशतवाद्यांनी सर्व संस्कृतींविरुद्धच युद्ध पुकारले आहे. केरी यांनी आज येथे फ्रान्सचे अध्यक्ष फ्रँकॉइस ऑलांद यांची भेट घेऊन अमेरिका त्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली.
सलाह अब्देसलाम याला पकडण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न चालू असून तो या हल्ल्यात सामील असलेल्या तीन भावांपैकी एक आहे. बेल्जियमचा दहशतवादी अब्देलहमीद अबौद या हल्ल्याचा सूत्रधार असून तो सीरियात असल्याचे समजते.
फ्रान्सचे पंतप्रधान मॅन्युअल व्हॉल्स यांनी सांगितले, की पॅरिसमधील हल्लेखोरांचे साथीदार बेल्जियममध्ये आहेत की नाहीत हे माहिती नाही, हल्ल्यात किती लोक सामील होते याचीही पक्की माहिती नाही. फ्रान्सच्या पोलिसांनी दहशतवाद्यांच्या १२८ ठिकाणांवर छापे टाकले असून लायॉन शहरात शस्त्रांचा साठा सापडला असल्याचे अंतर्गत सुरक्षामंत्री बेनार्ड कॅझेनेव्यू यांनी सांगितले. एकूण १०० जणांना नजरकैदेत ठेवले असून २३ जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, फ्रान्सच्या विमानांनी सीरियातील रक्का शहरात आयसिसच्या छावण्यांवर जोरदार हल्ले केले आहेत. शुक्रवारच्या हल्ल्याचा कट सीरियात आखला गेला व नंतर बेल्जियम येथे त्यावर पुढील अंमलबजावणी करून नंतर पॅरिसमध्ये हल्ला करण्यात आला, असे अध्यक्ष ऑलांद यांनी सांगितले.